नटराज करणार स्वागत, ॲप सांगणार गीता; जी-२० साठी नवी दिल्लीत जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:17 AM2023-09-07T07:17:10+5:302023-09-07T07:17:17+5:30
नटराजाची ही मूर्ती २७ फूट उंच, १८ टन वजनाची अष्टधातूची सर्वांत उंच मूर्ती आहे.
नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेच्या प्रमुख बैठकांचे आयोजन करणाऱ्या ‘भारत मंडपम्’मध्ये नटराजाची मूर्ती बसविण्यात आली आहे. ही मूर्ती देशाचा समृद्ध इतिहास, परंपरा, कला आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान म्हणाले, नटराजाची ही मूर्ती २७ फूट उंच, १८ टन वजनाची अष्टधातूची सर्वांत उंच मूर्ती आहे. तामिळनाडूतील स्वामी मलाई येथील प्रसिद्ध शिल्पकार राधाकृष्णन आणि त्यांच्या टीमने ही मूर्ती विक्रमी सात महिन्यांत साकारली आहे. नटराजाची ही भव्य मूर्ती देश-विदेशातील पाहुण्यांचे स्वागत करेल.
जी-२० परिषदेनिमित्त भारत- ब्रिटनदरम्यान आर्थिक सहकार्याची नवीन दारे खुली होतील. भारतीय निर्यातदारांना ब्रिटनच्या बाजारपेठेत प्रवेश मिळू शकेल. यात भारतातील ४.८ कोटी लघु व मध्यम उद्योगांचाही समावेश आहे.
- ऋषी सुनक, पंतप्रधान, ब्रिटन
जी-२० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या देश- विदेशांतील मान्यवरांना देशाचे डिजिटल सामर्थ्य दाखवण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला आहे. आधार, यूपीआय सह भगवद् गीतेबाबत माहिती देण्यासाठी विशेष ‘गीता’ ॲप तयार केले आहे.
शिवकालीन पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल लक्ष वेधणार
जी-२० संमेलनासाठी दिल्लीत दाखल होणाऱ्या विदेशी पाहुण्यांचे आकर्षक शिवकालीन पैठणी आणि करकरीत कोल्हापुरी चप्पल लक्ष वेधून घेणार आहे. प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये सज्ज झालेल्या क्राफ्ट बाजारात महाराष्ट्राचे वैशिष्ट्य ठरलेली पैठणी साडी तसेच कोल्हापुरी चप्पल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. क्राफ्ट बाजारात राजस्थानच्या मादा लाखापासून बनवलेल्या बांगड्या, बिहारचे मधुबनी तसेच तंजावरचे पेंटिंग्ज, गुजरात मातीपासून बनवलेले गुजरातचे पारंपरिक भित्तिशिल्प ‘लिप्पन’ या हस्तकला प्रतिनिधींपुढे सादर केल्या जातील.