संगीत नाटक अकादमी पुरस्काराने नाथराव नेरळकर सन्मानित

By admin | Published: October 24, 2015 03:10 AM2015-10-24T03:10:00+5:302015-10-24T03:10:00+5:30

संगीत नाटक अकादमीतर्फे वर्ष २०१४ चे पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये एका शानदार सोहळ्यात प्रदान

Natharu Neralkar honored by Sangeet Natak Akademi Award | संगीत नाटक अकादमी पुरस्काराने नाथराव नेरळकर सन्मानित

संगीत नाटक अकादमी पुरस्काराने नाथराव नेरळकर सन्मानित

Next

नवी दिल्ली : संगीत नाटक अकादमीतर्फे वर्ष २०१४ चे पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. नाथराव नेरळकर आणि अश्विनी भिडे -देशपांडे यांचा पुरस्कारप्राप्त मान्यवरांत समावेश आहे.
संगीत, नृत्य, नाटक क्षेत्रात उत्कृष्ट, तसेच अविरत कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फेराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्कारप्राप्त कलाकारांची निवड महा परिषदेच्या वतीने केली जाते. त्यात संगीत, नृत्य, नाटक या क्षेत्रातील एकूण ४० कलाकारांची निवड २०१४ च्या अकादमी पुरस्कारांसाठी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून शास्त्रीय गायक अश्विनी भिडे-देशपांडे आणि नाथराव नेरळकर यांचा समावेश, तर गोव्यातून तुलसीदास बोरकर आणि नाट्य अभिनेते रामदास कदम यांचा समावेश आहे.
संगीत नाटक अकादमी फेलोशिपप्राप्त कलाकारांना ३ लाख रुपये रोख, शाल, आणि स्मृतिचिन्ह देण्यात येते. यावर्षी ४ ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये तुलसीदास बोरकर (संगीतकार), एस. आर. जानकीरमन (संगीतज्ज्ञ), एम.एस. सथ्यू (चित्रपट निर्माते), विजय कुमार कीचलु (शास्त्रीय गायक) यांना सन्मानित करण्यात आले.
संगीत, नाटक, नृत्य, लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र दिले जाते. यामध्ये देशातील एकूण ३६ कलाकारांना आज सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रामध्ये अश्विनी भिडे-देशपांडे, इक्बाल अहमद खान व नाथराव नेरळकर (हिंदुस्थानी गायन), नयन घोष (तबला), रोणू मजुमदार (बासरी), आर. संथनागोपालन (गंभीर कंठ संगीत), थुरूवालापुथूर टी. ए. कालियामूर्ती (थावली), सुकन्या रामगोपाल (घातम), द्वाराम दुर्गाप्रसाद राव (व्हायोलिन) या कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
नृत्य क्षेत्रामध्ये आर्याम्बथ जनार्दनन (भरतनाट्यम्), उमा डोगरा (कथ्थक), एन. अमुसाना देवी (मणिपुरी), वेदांत्म राधेसयाम (कुचीपुडी), सुधाकर साहू (ओडीसी), अनिता शर्मा (सित्रया), जागृ महतो (चाऊ), नवतेजसिंग जोहर (समकालीन नृत्य), वाराणसी विष्णू नामपुथीरी (कथकली) या कलाकाराचा सन्मान करण्यात आला
नाट्य क्षेत्रामध्ये असगर वजाहत (नाट्यलेखन), सूर्या मोहन कुलश्रेष्ठा (दिग्दर्शन), चिदंबरराव जाम्बे (दिग्दर्शन), देब शंकर हल्दार (अभिनय), रामदास कामत (अभिनय), अमोद भट (नाट्य संगीत), मंजुनाथ भागवत होस्तोता (यक्षगाण), अमरदास माणकिपुरी (छत्तीसगड) यांना सन्मानित करण्यात आले.
लोककलांमध्ये पुरण शाह कोटी (लोकसंगीत-पंजाब), के. केशवासामी (पारंपरिक बाहुल्यांचे खेळ- पुदुचेरी), कलमंडलम राम मोहन (नेपथ्य-वेशभूषा- कथकली), रेबाकांत महंता (मुखवटे निर्मिती - आसाम), अब्दुल रशीद हाफिज (लोकसंगीत- जम्मू आणि काश्मीर), के. शानथोईबा शर्मा (थांग-ता- मणिपूर), रामदयाल शर्मा (नौटंकी- उत्तर प्रदेश), थांग डारलोंग (लोकसंगीत- त्रिपुरा) या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कला क्षेत्राच्या सर्वंकष कामगिरीसाठी अक्षरा के. व्ही., इंदूधरा निदोडे यांना गौरविण्यात आले.

Web Title: Natharu Neralkar honored by Sangeet Natak Akademi Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.