‘नथुराम’भक्त पोंक्षे शिवसेनेचे ‘स्टार प्रचारक’
By admin | Published: January 24, 2017 07:26 PM2017-01-24T19:26:09+5:302017-01-24T19:26:09+5:30
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी ‘हे राम नथुराम’ या नाटकामुळे वादात सापडलेल्या शरद पोंक्षे यांना शिवसेनेचे ‘स्टार प्रचारक’ केले आहे.
Next
>‘नथुराम’भक्त पोंक्षे शिवसेनेचे ‘स्टार प्रचारक’
उद्धव, आदित्य ठाकरेंसह ४० जणांचा यादीत समावेश
नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी शिवसेना, मनसे व रासपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ४० जणांचा यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे ‘हे राम नथुराम’ या नाटकामुळे वादात सापडलेल्या शरद पोंक्षे यांनादेखील पक्षाने ‘स्टार प्रचारक’ केले आहे. नागपुरात पोंक्षे यांचा जोरदार विरोध झाला. त्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यानदेखील त्यांना विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात फेब्रुवारी महिन्यात १० महानगरपालिका, २५ जिल्हापरिषदा व २८३ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. प्रत्येकच पक्षाने ‘स्टार प्रचारकांची यादी तयार केली असून ती निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे.
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, वनमंत्री रामदास कदम यांच्यासह विविध आमदार व खासदारांचा समावेश आहे. आदेश बांदेकर, अमोल कोल्हे या मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांनादेखील ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे.
दुसरीकडे मनसेतर्फेदेखील ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सहकारमंत्री महादेव जानकर हे रासपचे ‘स्टार प्रचारक’ राहणार आहेत. ‘रासप’तर्फे १४ जणांची यादी देण्यात आली आहे.