गांधींच्या गुजरातमध्ये साजरा केला नथुरामचा जन्मदिवस, पोलिसांनी सहा जणांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 01:27 PM2019-05-21T13:27:14+5:302019-05-21T13:27:34+5:30
भाजपाच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधींचा हत्यारा असलेल्या नथुरामवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून वाद निर्माण झाला होता.
अहमदाबादः भाजपाच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधींचा हत्यारा असलेल्या नथुरामवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून वाद निर्माण झाला होता. तो वाद शांत होत नाही, तोच आता गुजरातमधल्या सूरतमध्ये नथुराम गोडसेचा वाढदिवस साजरा केल्याचं निदर्शनास आलं आहे. सूरतच्या लिंबायत भागात महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करण्यात आल्यानं पुन्हा एकदा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. सूरतमधल्या लिंबायत भागात सूर्यमुखी हनुमान मंदिर आहे.
तिथे 19 मे रोजी महात्मा गांधीजींचा हत्यारा असलेल्या नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. मंदिराच्या आवारात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या या लोकांना नथुराम गोडसेची प्रतिमा समोर ठेवून त्याचा जन्मदिवस साजरा केला आणि एकमेकांना गोडधोडही भरवलं. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा हत्यारा नथुरामचा जन्मदिवस साजरा केल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गुजरात सरकारनं यावर कारवाई केली आहे. गुजरात पोलिसांनी गोडसेचा जन्मदिवस साजरा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सूरत पोलिसांना दिले होते.
सूरत पोलीस कमिश्नर सतीश शर्मा यांनी नथुरामचा जन्मदिवस साजरा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हिंदू महासभेचे कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे महात्मा गांधींचा जिथे जन्म झाला आणि जिथून त्यांनी सत्याग्रह केला, त्याच गुजरातमध्ये नथुरामचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गुजरातमधले गांधीवादी लोकही नाराज झाले आहेत.