हिंदू महासभेने उभारला नथुराम गोडसेचा पुतळा
By admin | Published: October 3, 2016 04:09 AM2016-10-03T04:09:06+5:302016-10-03T04:09:06+5:30
गांधींना त्यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली जात असताना अ.भा. हिंदू महासभेने हा दिवस ‘धिक्कार दिवस’ म्हणून पाळला
मेरठ : संपूर्ण देशात रविवारी महात्मा गांधींना त्यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली जात असताना अ.भा. हिंदू महासभेने हा दिवस ‘धिक्कार दिवस’ म्हणून पाळला व त्यांच्या येथील कार्यालयात गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे याच्या पुतळ््याचे अनावरण केले.
या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या येथील शारदा रोडवरील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास फारच थोडे लोक उपस्थित होते. हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पं.अशोक शर्मा यांनी नथुराम गोडसेच्या पुतळ््याचे अनावरण केले. त्याआधी विधिवत पूजा करण्यात आली व अनावरणानंतर पुतळ््याला हार घालून शाल प्रदान करण्यात आली व होमहवनही करण्यात आले. अनावरणानंतर केलेल्या भाषणात पं. शर्मा यांनी नथुराम गोडसे हाच खरा ‘राष्ट्रपुरुष’ असल्याचे जाहीर केले व गांधींऐवजी गोडसेचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. इतकी वर्षे आपण गोडसेचे तत्वज्ञान अनुसरले असते तर उरी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून धडा शिकविण्याची वेळच आली नसती, असा दावाही त्यांनी केला. भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करताना शर्मा म्हणाले की, भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर सावकरांप्रमाणेच गोडसेच्या योगदानाचेही ऋण मानेल, अशी अपेक्षा होती. परंतु राजकीय संधीसाधूपणा करायचा असल्याने गोडसेचा मार्ग स्वीकरणे त्यांच्या पचनी पडले नाही, असे दिसते.
हाच मुद्दा सविस्तर मांडताना ७२ वर्षांचे पंडित शर्मा म्हणाले की, सावरकर आणि गोडसे हे एकाच राजकीय विचारधारेचे प्रतिनिधी असल्याने भाजपा या दोघांमध्ये दुजाभाव करू शकत नाही. पण संसद भवनातील सावरकरांच्या फोटोला दरवर्षी हार घालायचे व गोडसेकडे ढुंकूनही पाहायचे नाही, हा आपमतलबीपणा आहे. हिंदू महासभेने दोन वर्षांपूर्वी गोडसेचा पुतळा उभारण्यासाठी चबुतराही बांधला होता. (वृत्तसंस्था)
>५० किलोचा दोन फुटी पुतळा
नथुराम गोडसेचा हा पुतळा फक्त चेहरा व छातीपर्यंतचा असून त्याची उंची
दोन फूट आहे. हिंदू महासभेचे उत्तर प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र वर्मा यांनी हा
पुतळा जयपूरहून बनवून आणला. अशा ‘महान’ कामासाठी इतरांपुढे हात पसरण्याचा संकोच वाटल्याने पुतळ््यासाठी सर्व ४५ हजार रुपयांचा खर्च आपण स्वत:च केला, असे वर्मा यांनी सांगितले.