स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही 'या' गावात पोहोचली नाही वीज, जाणून घ्या पूर्ण कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 11:51 AM2019-06-13T11:51:55+5:302019-06-13T12:00:07+5:30
स्वातंत्र्याला 70हून अधिक वर्षं लोटली, तरीही देशातील या गावात अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही.
त्रिशूलीः स्वातंत्र्याला 70हून अधिक वर्षं लोटली, तरीही देशातील या गावात अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. छत्तीसगडमधल्या त्रिशूली गावात अद्यापही वीज पोहोचलेली नाही. त्रिशूली गावात जवळपास 100 घरं आहेत. परंतु त्या गावात प्रशासनाला आजपर्यंत वीज पोहोचवता आलेली नाही. स्थानिकांनी आता कलेक्टर यांना पत्र लिहून वीज पुरवण्याची मागणी केली आहे.
पत्रात गावकरी लिहितात, आजपर्यंत आमच्या गावात वीज पोहोचू शकलेली नाही. इथे जवळपास 100हून अधिक घरं आहेत. आमची मुलं वीज नसल्यानं सूर्यास्त झाल्यानंतर अभ्यास करत नाहीत. त्यानंतर बलरामपूरचे जिल्हाधिकारी संजीव कुमार झा म्हणाले, वीज अद्यापपर्यंत पोहोचलेली नसलेल्या गावांत सर्व्हे करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माजरा-टोला विद्युतीकरण योजनेंतर्गत त्रिशूली गावात वीज पोहोचवणार आहेत. तसेच त्रिशूलीसह इतर गावांमध्येही वीज पोहोचवली जाईल.
Chhattisgarh: Locals of Trishuli village in Balrampur say,"till date electricity has not reached our village, there are around 100 houses here. Our children can't study after sun sets due to lack of electricity. We have written to the collector." pic.twitter.com/txXK5gMvoG
— ANI (@ANI) June 13, 2019
छत्तीसगडमधील 122 गावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नसल्याची माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली होती. बस्तरमधील ज्या बामदई गावातून मुख्यमंत्र्यांनी वीजपुरवठ्याचा उत्सव सुरू केला तिथेच अंधार आहे. तर गेल्या वर्षी मोदी सरकारनं देशातल्या सर्व गावांत वीज पोहोचवल्याचा दावा केला होता. देशात 100% वीज पुरवठा झाला आहे. सरकारने एक हजार दिवसांत 18 हजार 452 गावांमध्ये वीज पोहोचवली आहे, असा दावा मोदी सरकारनं केला होता. परंतु अद्यापही काही अशी गावं आहेत, ज्या गावांत वीज आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तर दुसरीकडे डेटा एजन्सी ब्लूमबर्ग यांनी सरकारी आकडेवारीच्या हवाल्याने म्हटले होते की, 2014नंतर 4 वर्षांमध्ये वीजपुरवठा पोहोचवलेल्या 19,727 गावांपैकी फक्त 8% गावांमधील घरातच वीज पोहोचली आहे. उर्वरित 92% गावांतील बहुतांश घरे ही अद्याप अंधारात आहेत. यात मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, पंजाब आणि महाराष्ट्रातील गावांचा समावेश आहे.