उद्योग व्यवसायात ठसा उमठविणा-या देशभरातील 44 उद्योजकांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 08:29 AM2018-03-04T08:29:04+5:302018-03-04T08:29:04+5:30
देशभरातील विविध राज्यांतील उद्योग व्यवसायात आपला ठसा उमठविणा-या 44 उद्योजकांना भारतीय राज्य औद्योगिक विकास आणि गुंतवणूक महामंडळ परिषदेच्यावतीने (कोसीडीसी) पाचव्या राष्ट्रीय पुरस्काराने सायंकाळी...
पणजी : देशभरातील विविध राज्यांतील उद्योग व्यवसायात आपला ठसा उमठविणा-या 44 उद्योजकांना भारतीय राज्य औद्योगिक विकास आणि गुंतवणूक महामंडळ परिषदेच्यावतीने (कोसीडीसी) पाचव्या राष्ट्रीय पुरस्काराने सायंकाळी शनिवारी येथील तारांकित हॉटेलमध्ये गौरविण्यात आले. या सोहळ्य़ात छाप पाडली ती कर्नाटकाने. या राज्यातील सर्वाधिक आठ उद्योजकांना हा पुरस्कार मिळाला, तर गोव्यातील पाच जणांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
खासदार नरेंद्र सावईकर, आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्य़ेकर, औद्योगिक विकास महामंडळाचे चेअरमन ग्लेन टिकलो, कोसीडीसीच्या चेअरमन स्मिता भारद्वाज, ईडीसीचे उपाध्यक्ष संतोष केंकरे, व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र वेण्रेकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कोसीडीसीच्या चेअरमन भारद्वाज म्हणाल्या की, राज्य स्तरीय आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नव्या उद्योगांना चालना मिळत आहे. अशा पुरस्कारातून अनेक युवा वर्गाना प्रेरणा मिळत आहे. त्याचबरोबर उद्योजकांनाही पाठबळ मिळते. सध्या पंजाब नॅशनल बँकेमुळे बँकांची स्थिती आव्हानात्मक बनली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकास महामंडळाकडील कर्ज उद्योजकांना मोठे लाभदायक ठरणारे असून, दीर्घ मुदतीचे कर्ज योजनाही उद्योग व्यवसायासाठी पूरक आहेत. महामंडळे गुणवत्तेला वाव देत असून, त्यातून रोजगार निर्मितीलाही हातभार लावत आहेत.
ईडीसीचे अध्यक्ष कुंकळ्य़ेकर यांनी राज्यातील मुख्यमंत्री रोजगार योजनेचे कौतुक करीत, या योजनेची माहिती दिली. त्याचबरोबर ईडीसीची वसुली 93 टक्के असल्याबद्दल कर्मचा:यांच्या कामाचे कौतुक केले. सावईकर यांनी कर्नाटक राज्य आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर येथील ईडीसीच्या कामाची प्रशंसा करीत प्रेरणादायी उद्योजकांच्या यशस्वी कथा मासिकांतून पुढे याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच कोसिडीसी मेंबर कार्पोरेशन्स अॅटेंडिग अॅवार्डचेही वितरण करण्यात आले. त्यात देशभरातील 13 जणांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गोव्यातील मुख्यमंत्री रोजगार योजना पुरस्कारांचे दहाजणांना वितरण करण्यात आले.
गोव्यातील पाचजणांचा गौरव
या सोहळ्य़ात अनिल लोटलीकर (गोवा सिंटीरेड प्रॉडक्ट्स लि.), राजेश देसाई अँड स्मृती देसाई (रित्झ क्लासिक रेस्टॉरंट), मिता प्रशांत कामत आणि प्रशांत वसंत कामत (कामत अॅटोमोबाईल प्रा. लि.), व्हिक्टर आल्बेकुर्क (अल्कोन रिसोर्ट होल्डिंग्स प्रा. लि.), श्रीकांत परुळेकर (अस्त्र काँक्रिट प्रॉडक्ट्स).
मुख्यमंत्री रोजगार योजना पुरस्कार प्राप्त : हेडरिच बॉस्को रोझारिओ (बेती), कविता कासकर (पर्वरी), लॉरिनो रझमान अंद्राद (सासष्टी), मोनिशा ओल्गा परेरा (साळगाव), पूनम रमाकांत परब (म्हापसा), रोहन दिवकर (हणजूण), श्रद्धा सावंत (कुंभारजुवे), शिलॉन सिक्सास (सासष्टी), सिताराम राऊत (पेडणो), विनाय दामले (डिचोली).