National Awards: नाराज विजेत्या कलाकारांना स्पीड पोस्टनं पाठवणार राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 07:43 AM2018-05-05T07:43:31+5:302018-05-05T08:07:29+5:30

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते मिळणार असल्याचे कळल्यानंतर 72 कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला.

National Award: national award will be sent by speed post to winners | National Awards: नाराज विजेत्या कलाकारांना स्पीड पोस्टनं पाठवणार राष्ट्रीय पुरस्कार

National Awards: नाराज विजेत्या कलाकारांना स्पीड पोस्टनं पाठवणार राष्ट्रीय पुरस्कार

Next

नवी दिल्ली -  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते मिळणार असल्याचे कळल्यानंतर 72 कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. पुरस्कारांच्या 64 वर्षांच्या या प्रथेला यामुळे गालबोट लागले असून, अनेक कलाकारही नाराज झाले आहेत.

मात्र, ज्या विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता, त्यांचे पुरस्कार व प्रमाणपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार व प्रमाणपत्र विजेत्या कलाकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पीड पोस्ट सुविधेची मदत घेण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. 

विजेत्यांनी कितीही सन्मानापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचे पुरस्कार त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयानं निश्चित केले आहे.  70 हून अधिक कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घातला. या पार्श्वभूमीवर विजेत्यांचे पुरस्कार त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवावेत?, यावर विचारविनिमय करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विचारविनिमय केल्यानंतर केंद्र सरकारनं ठरवले की दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पीड पोस्ट सुविधेच्या मदतीनं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, प्रत्येक वर्षी तीन-चार विजेते देशात नसल्यानं किंवा प्रकृतीच्या कारणांमुळे पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती दर्शवू शकत नाहीत. तेव्हा अशा परिस्थितीत सरकारकडून स्पीड पोस्टच्या सहाय्याने विजेत्यांपर्यंत पुरस्कार पोहोचवला जातो.   

(72 कलाकारांचा बहिष्कार)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा खरं तर चित्रपटाच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणे प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचा क्षण असतो. यंदाचा पारितोषिक वितरण सोहळा मात्र याला अपवाद ठरला. मोजकेच पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्यानंतर उर्वरित पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते देण्यात आले. प्रथेप्रमाणे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. या वर्षी मोजके ११ पुरस्कार सोडले तर इतर सर्व पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते देण्यात आले. ‘कलाकारांची नाराजी दूर करण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक आणि यंदाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शेखर कपूर यांना मध्यस्थीसाठी  पाठविण्यात आले. त्यानंतरही काही कलाकारांचा बहिष्कार हा कायम राहिला.

विज्ञान भवनात बुधवारी संध्याकाळी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. तेव्हाच या नव्या पायंड्याची कल्पना कलाकारांना आली. या विषयी आपली नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली. ‘आमच्यासाठी हा सर्वोच्च क्षण आहे. दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्तेच सन्मान दिला जातो. मग याचवेळी आम्हाला यथोचित सन्मानापासून वंचित का ठेवले जात आहे,’ असा प्रश्न या कलाकारांनी उपस्थित केला. ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात, त्यामुळे त्यांचे विशेष महत्त्व आहे. अन्यथा ते देखील भारंभार पुरस्कारांपैकी एक बनून राहिले असते,’ अशी प्रतिक्रिया सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळविणाऱ्या ‘न्यूटन’चा निर्माता मनीष मुंद्रा याने ट्विटरवरुन व्यक्त केली.

राष्ट्रपती भवनाकडून स्पष्टीकरण
‘राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून रामनाथ कोविंद हे सर्व पुरस्कार आणि पदवीदान सोहळ्यांना एका तासासाठीच हजेरी लावतात. त्यांनी हे पद स्वीकारल्यापासूनच हा प्रोटोकॉल ठरला आहे. याबाबतची कल्पना माहिती व प्रसारण खात्याला काही आठवड्यांपूर्वीच दिलेली होती. अचानक त्याबद्दल जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याचे राष्ट्रपती भवनालाही आश्चर्य वाटते.’

मराठी कलाकारांनी व्यक्त केली नाराजी
‘विशेष उल्लेख’ विभागात पुरस्कार मिळालेल्या ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनीही सोहळ्याकडे पाठ फिरवली. ‘कच्चा लिंबू’चा दिग्दर्शक प्रसाद ओक, निर्माता मंदार देवस्थळी, दिग्दर्शक नागराज मंजुळे या सर्वांनीच सरकारच्या चुकीच्या प्रथेबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली.

पुरस्कारप्राप्त कलाकारांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला एक खुले पत्र पाठवून आपला असंतोष व्यक्त केला. ‘सन्मानापेक्षाही आमच्या मनात नाराजीची भावना आहे. हा आमचा विश्वासघात आहे. 64 वर्षांची परंपरा एका झटक्यात बदलली जाते, हे दुर्दैवी आहे,’ असे या कलाकारांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

चार राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या नागकीर्तन या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक गांगुली, गायक येशुदास, अभिनेता फदाह फासिल, अभिनेत्री पार्वती यांच्यासह 70 हून अधिक कलाकारांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

Web Title: National Award: national award will be sent by speed post to winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.