Bollywood : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 10:25 AM2021-07-16T10:25:16+5:302021-07-16T10:34:50+5:30
सुरेखा सीकरी यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने माध्यमांना दिली. स्ट्रोकनंतर लवकरच सुरेखाजींच्या प्रकृती सुधारणा होण्यास सुरुवात झाली होती
मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री 'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी यांचे निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सुरेखा सीकरी यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने माध्यमांना दिली. स्ट्रोकनंतर लवकरच सुरेखाजींच्या प्रकृती सुधारणा होण्यास सुरुवात झाली होती. त्या लोकांना ओळखूही लागल्या. मात्र, त्यांना चालताना आधार लागायचा. याआधी 2018 मध्येही त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यामुळे सुरेखाजींना अर्धांगवायूचा झटका आला. त्यातून त्या बऱ्यादेखील झाल्या. मात्र, जास्त काम करु शकल्या नाहीत.
सुरेखा यांना सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून तीन वेळा नॅशनल अॅवॉर्ड मिळाला आहे. सिनेमांशिवाय त्यांनी सांझा चूल्हा, सात फेरे : सलोनी का सफर आणि बालिका वधू यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.