"तूने मुझे बुलाया शेरावालिये...", फारुख अब्दुल्ला माता वैष्णो देवीच्या भक्तीत लीन, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:32 IST2025-01-24T12:07:02+5:302025-01-24T12:32:23+5:30

Farooq Abdullah : गुरुवारी कटरा येथील एका आश्रमात भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

National Conference leader Farooq Abdullah was seen singing the bhajan 'Tune Mujhe Bulaya Sherawaliye' in Katra | "तूने मुझे बुलाया शेरावालिये...", फारुख अब्दुल्ला माता वैष्णो देवीच्या भक्तीत लीन, पाहा VIDEO

"तूने मुझे बुलाया शेरावालिये...", फारुख अब्दुल्ला माता वैष्णो देवीच्या भक्तीत लीन, पाहा VIDEO

Farooq Abdullah :जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला गुरुवारी (दि.२३) कटरा येथील माता वैष्णो देवीच्या मंदिरात पोहोचले. यावेळी, त्यांनी मंदिरात भजन सुद्धा म्हटल्याचे दिसून आले. याठिकाणी फारुख अब्दुल्ला यांनी गायकांच्या सूरांशी जुळवून घेत "तूने मुझे बुलाया शेरावालिये, मैं आया मैं आया शेरावालिये" हे भजन गायले. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गुरुवारी कटरा येथील एका आश्रमात भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी, फारुख अब्दुल्ला यांनी गायक आणि मुलांसोबत "तूने मुझे बुलाया शेरावालिये, मैं आया मैं आया शेरावालिये" हे भजन गायले.  याआधी एप्रिल २०२४ मध्ये त्यांचा राम भजन गातानाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान फारुख अब्दुल्ला यांनी कटरा येथील रोपवे बांधकाम प्रकल्पाच्या मुद्द्यावर भाष्य केले. तसेच, त्यांनी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डावरही निशाणा साधला.

रोपवे बांधकाम प्रकल्पाच्या मुद्द्यावरून फारुख अब्दुल्ला म्हणाले की, मंदिर चालवणाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या हिताला बाधा पोहोचवणारी किंवा त्यांच्यासाठी समस्या निर्माण करणारी कोणतीही कृती करू नये. तसेच, कटरा येथील लोकांचे कौतुक करत, तुम्ही हे थांबवण्यासाठी धाडस दाखवले आणि धाडसाने लढलात. त्यामुळे त्यांना हे समजले आहे की, सत्ता सरकारकडे नाही तर लोकांकडे आहे, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.

पुढे फारुख अब्दुल्ला म्हणाले की, या परिसरात राहणारे लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे देवीच्या आशीर्वादावर अवलंबून आहेत. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सत्तेत असलेल्या लोकांना वाटतंय की, ते अजिंक्य आहेत. पण ते तसे नाहीत. जेव्हा दैवी शक्ती प्रबळ होते, तेव्हा इतर सर्व काही कमी होते. कॅलिफोर्नियामध्ये काय झाले, ते पहा. एवढेच नाही तर प्रत्येक धर्माच्या मूलभूत शिकवणी सारख्याच असतात आणि स्वार्थी लोक याचा फायदा घेतात, असेही फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले.

Web Title: National Conference leader Farooq Abdullah was seen singing the bhajan 'Tune Mujhe Bulaya Sherawaliye' in Katra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.