'...तर जम्मू-काश्मीरमध्ये कुठेही तिरंगा दिसणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 03:21 PM2018-08-01T15:21:42+5:302018-08-01T15:24:11+5:30
नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदाराचं वादग्रस्त विधान
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात कुठेही तिरंगा दिसणार नाही, असं वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद अहमद राणा यांनी केलं आहे. राज्यातील 35ए आणि कलम 370 हटवण्याचा प्रयत्न केल्यास जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकताना दिसणार नाही, असं राणा म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरात लागू असलेलं कलम 370 रद्द करु, असं नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेकदा म्हटलं होतं. तोच संदर्भ देत जावेद राणा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवू नका, असा इशारा दिला. 'कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात कुठेही तिरंगा दिसणार नाही,' असं राणा म्हणाले. नेका विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे राणा मेंढरमधील छूंगा गावातील एका जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना कलम 370 च्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.
If any alteration is made in Article 35A or if Section 370 is abolished, then the Indian flag will not be seen here(Kashmir): Javed Rana, National Conference MLA (31.07.18) pic.twitter.com/S8ivi9CujA
— ANI (@ANI) August 1, 2018
कलम 370 संपुष्टात आल्यास दुसऱ्या राज्यांमधील लोक जम्मू-काश्मीरमध्ये येतील आणि इथलं सगळं काही खरेदी करतील, असं राणा यांनी म्हटलं. कलम 370 लागू असल्यामुळे आज अनेकांना नोकऱ्या मिळत आहेत. मात्र हे कलम रद्द केल्यास सर्व काही संपून जाईल. तुमचं भविष्य धोक्यात येईल, असं जावेद राणा म्हणाले.