आता मिड डे मिल सोबत नाश्ताही मिळणार; नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासही होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 01:28 PM2020-08-02T13:28:26+5:302020-08-02T13:56:01+5:30
नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याचीही तरतूद
मुंबई: सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासोबत नाश्ताही देण्यात यावा, अशी सूचना नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये मुलांना भोजनासोबत नाश्ताही मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं याच आठवड्यात नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी नाश्त्याची आवश्यकता असते. त्यामुळे मध्यान्ह भोजनेच्या योजनेचा आणखी विस्तार करण्यात यावा, अशी शिफारस नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.
'विद्यार्थ्यांना पुरेशी पोषणमूल्य मिळत नसल्यास त्यांना व्यवस्थित अभ्यास करता येत नाहीत. शरीरासाठी आवश्यक घटक न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासोबत शारीरिक विकासदेखील गरजेचा आहे. शाळेत प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, समुपदेशक असणं आवश्यक आहे,' असं नवं शैक्षणिक धोरण सांगतं.
'पौष्टिक नाश्ता केल्यानंतर सकाळचे काही तास अभ्यासासाठी उत्तम असल्याचं सर्वेक्षण सांगतं. या कालावधीत विद्यार्थी अवघड विषयांचा अभ्यास करू शकतात. त्यामुळे या वेळेत विद्यार्थ्यांना साधाच, पण पोषणमूल्य असलेला ब्रेकफास्ट दिला जाऊ शकतो,' असं धोरणात नमूद करण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी गरम जेवण देणं शक्य नसेल, तिथे साधं, पण पौष्टिक जेवण देता येऊ शकेल. अशा भागांमध्ये शेंगदाणा किंवा चणे गूळ आणि स्थानिक फळांसोबत एकत्र येऊन दिले जाऊ शकतात, असा पर्याय शैक्षणिक धोरणातून सुचवण्यात आला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. 'सर्व शालेय विद्यार्थ्यांची ठराविक कालावधीतून आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्याची नोंद असणारं आरोग्यपत्र देण्यात यावं,' अशी सूचना धोरणात करण्यात आली आहे. मुलाचं वय ५ वर्ष होण्यापूर्वी त्यांना बालवाटिकेत पाठवण्यात यावं, असा सल्ला देण्यात आला आहे.