काश्मिरात ग्रा.पं.वर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:54 AM2019-08-12T04:54:36+5:302019-08-12T04:54:50+5:30
येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
नवी दिल्ली : येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकारने राज्यातील सगळ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सूचना पाठवल्या आहेत व १५ आॅगस्ट रोजी राष्ट्रध्वज आपापल्या पंचायतींवर फडकवला जाईल याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असेही त्या आदेशात स्पष्ट करण्यात आल्याचे रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले. काश्मीरमधील जनतेनेही आपापल्या घरांवर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज उभारला पाहिजे, असेही आवाहन रेड्डी यांनी केले आहे.
रेड्डी म्हणाले की, तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. लोक घरांतून बाहेर पडत आहेत आणि कुठूनही कोणत्याही प्रकारच्या गडबड, गोंधळाचे वृत्त नाही. पाकिस्तानने आम्ही काहीही व कोणत्याही थराला जाऊन करायला तयार आहोत, असे उघडपणे त्यांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये म्हटलेले असल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले आहे. श्रीनगर विमानतळावरून काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि माकपचे नेते सीताराम येचुरी यांना परत पाठवल्याबद्दल बोलताना रेड्डी यांनी सुरक्षा व्यवस्था नजरेसमोर ठेवून त्यांना परत पाठवले गेले. असेच पाऊल राज्याच्या पोलिसांनीही उचलले आहे, असे सांगितले.