नॅशनल हेराल्ड प्रकरण: मी कोणालाही घाबरत नाही - सोनिया गांधी

By admin | Published: December 8, 2015 11:32 AM2015-12-08T11:32:41+5:302015-12-08T13:12:27+5:30

मी इंदिरा गांधी यांची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही, असे आक्रमक वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले.

National Herald Case: I am not afraid of anyone - Sonia Gandhi | नॅशनल हेराल्ड प्रकरण: मी कोणालाही घाबरत नाही - सोनिया गांधी

नॅशनल हेराल्ड प्रकरण: मी कोणालाही घाबरत नाही - सोनिया गांधी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - मी इंदिरा गांधी यांची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही, असे आक्रमक वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याच्या निर्णयानंतर त्या बोलत होत्या.

नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यासाठी १९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता हजर राहण्याचे आदेश दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने सोनिया व राहुल गांधी यांना दिले आहेत. नॅशनल हेराल्डची ५ हजार कोटींची संपत्ती हडप केल्याचा आरोप भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आपण काळजीत आहात का? असा सवार सोनिया यांना विचारण्यात आला असता, मी निराश होण्याचे काहीच कारण नाही. मी इंदिरा गांधी यांची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही असे सांगत आपला न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

आता बंद पडलेले ‘नॅशनल हेराल्ड’ हे वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या कंपनीचे अधिग्रहण करताना लबाडी आणि फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या खटल्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयात आरोपी म्हणून हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. भाजपा नेते डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवर महानगर दंडाधिकाऱ्यांनी सोनिया व राहुल गांधी यांच्याखेरीज मोतीलाल व्होरा, आॅस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोडा व यंग इंडिया लि. या अन्य पाच आरोपींवर ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स गेल्या वर्षी २६ जून रोजी जारी करण्यात आले होते.
‘नॅशनल हेराल्ड’ हे दैनिक पं. जवाहरलाल नेहरु यांनी १९३८ मध्ये सुरु केले. कालांतराने ते डबघाईला आले व २००८ मध्ये त्याचे प्रकाशन कायमचे बंद झाले तेव्हा ते चालविणाऱ्या असोशिएडेट जर्नल्स या कंपनीवर ९० कोटी रुपयांचे कर्ज होते.  ही कंपनी ज्या़ यंग इंडियन लि. कंपनीने ताब्यात घेतली त्यात सोनिया व राहुल गांधी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा डॉ. स्वामी यांचा दावा आहे. असोशिएटेड जर्नल्सवरील ९० कोटींचे कर्ज यंग इंडियनकडे वर्ग केले गेले. प्रत्यक्षात असोशिएडेड जर्नल्स कंपनीच्या विविध शहरांमधील सुमारे दोन हजार कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा व्यापारी विकास करण्याच्या हेतूने हा व्यवहार करण्यात आला, असा आरोप आहे.

Web Title: National Herald Case: I am not afraid of anyone - Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.