नॅशनल हेराल्ड: सोनिया व राहुल गांधींना जामीन, २० फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी
By admin | Published: December 19, 2015 03:22 PM2015-12-19T15:22:28+5:302015-12-19T15:36:10+5:30
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना विनाअट जामीन मंजूर केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधी यांना प्रचंड दिलासा देताना पतियाळा हाऊस कोर्टाने त्यांच्यासह मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस व सुमन दुबे यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. वैयक्तिक ५० हजार रुपयांचा जातमुचलका आणि एक हमीदार द्यायला सांगत कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सोनिया गांधींसाठी ए. के. अँटनी यांनी तर राहूल गांधींसाठी प्रियंका गांधींनी हमीपत्र दिले आहे.
याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया व राहूल देश सोडून जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचे पासपोर्ट ताब्यात घ्यावेत व त्यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करावी अशी मागणी केली होती. मात्र, राजकीय पाळेमुळे या देशात रुजलेले गांधी असं काही करतिल असं वाटत नसल्याचं सांगत कोर्टाने बिनशर्त जामीन मंजूर केला आणि स्वामी यांची मागणी फेटाळली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सुमारे ५००० हजारांच्या संख्येने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेल्या पतियाळा हाऊस कोर्ट परीसराला युद्धछावणीचे स्वरूप आले होते. गाडीमधून उतरून कोर्टाच्या दिशेने चालत जाणा-या सोनिया व राहूल यांचा जयघोष करत काँग्रेससमर्थकांनी हा परीसर दणाणून सोडला. नॅशनल हेराल्ड प्रकरण सध्या देशभरात गाजत असून, या खटल्यामुळे भाजपा व काँग्रेस यांच्यामध्ये प्रचंड वादविवाद झडले आहेत. हे प्रकरण म्हणजे १०० टक्के राजकीय सूड असल्याची प्रतिक्रिया राहूल गांधींनी व्यक्त केली होती, तर कोर्टाच्या कामकाजात आम्ही राजकीय हस्तक्षेप करत नसल्याचं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केलं होतं. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला असून अधिवेशनाचे काम पहिल्या काही दिवसांमध्ये ठप्प पडलेले आहे.