National Highways: 'ना टोल प्लाजा ना फास्ट टॅग; थेट बँकेतून कट होणार पैसे'; नितिन गडकारींनी सांगितला मेगा प्लॅन...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:40 PM2022-08-24T13:40:38+5:302022-08-24T13:56:58+5:30
National Highways: लवकरच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा बंद होणार आहेत, यासाठी सरकारने पायलट प्रोजक्ट सुरू केला आहे.
National Highways: राष्ट्रीय महामार्गांवर सूसाट वेगाने गाड्या धावतात, पण टोल नाका आल्यावर गाड्यांना वेग कमी करावाच लागतो. पण, आता या टोलपासून सुटका मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच देशभरातील महामार्गांवर असलेले सर्व टोल प्लाझा आणि फास्ट टॅग रद्द करणार आहेत. ही योजना राबवण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू असल्याची माहिती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा हटवण्याच्या योजनेवर सरकार वेगाने काम करत आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कॅमेऱ्यातून वाहनांच्या नंबर प्लेटचा फोटो क्लिक केला जाईल आणि थेट त्यांच्या बँक खात्यातून टोलचे पैसे कापले जातील. 23 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्लीतील FICCI फेडरेशन हाऊस येथे 'Accelerating the Road Infrastructure: New India @ 75' या रोड अँड हायवे समिटच्या तिसर्या आवृत्तीदरम्यान ते बोलत होते.
2019 पासून तयारी सुरू होती
नितीन गडकरी म्हणाले की, "पूर्वी लोक आपल्या गाडीला फॅंसी नंबर प्लेट बसवत असायचे, पण 2019 मध्ये आम्ही एक नियम केला, ज्यानुसार कार कंपनी नंबरप्लेट बसवून देतील. यामुळे, महामार्गांवर लावलेल्या कॅमेऱ्याला नंबर प्लेटचा फोटो घेता येईल. टोल प्लाझाच्या जागी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे लावले जात आहेत, जे वाहनांच्या नंबर प्लेट्स वाचतील आणि वाहन मालकांच्या लिंक केलेल्या बँक खात्यांमधून टोल कपात करतील. ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र, टोल प्लाझावर टोल न भरणाऱ्या वाहनधारकाला शिक्षेची तरतूद अद्याप कायद्यात नाही, ही मोठी अडचण आहे. यासाठी लवकरच कायदा होऊ शकतो,'' अशी माहितीही गडकरी यांनी दिली.
फास्ट टॅगद्वारे 97 टक्के टोल वसुली
ते पुढे म्हणाले की, ''सध्या सुमारे 40,000 कोटी रुपयांच्या एकूण टोल वसुलीपैकी 97 टक्के रक्कम फास्टॅगद्वारे केली जाते. उर्वरित 3% FASTag वापरत नसल्यामुळे सामान्य टोल दरापेक्षा जास्त पैसे देतात. FASTag सह टोल प्लाझा ओलांडण्यासाठी प्रत्येक वाहनाला अंदाजे 47 सेकंद लागतात. सरकारी आकडेवारी पाहिल्यास, दर तासाला 112 वाहने मॅन्युअल टोल कलेक्शन लेनमधून जातात. त्या तुलनेत 260 हून अधिक वाहने इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन लेनमधून दर तासाला टोल भरतात. पण जेव्हापासून FASTag चा वापर सुरू झाला, तेव्हापासून देशभरातील टोलनाक्यांवरील वाहतूक सुलभ झाली आहे. मात्र त्यानंतरही देशातील अनेक टोलनाक्यांवर गर्दी होते.''
FASTag मध्ये समस्या
ते पुढे म्हणतात की, ''FASTag मध्ये काही समस्या आहेत. उदाहरणार्थ, टॅगमध्ये पैसे कमी असलेले लोक लेनमध्ये येतात आणि पैसे न कटल्यामुळे उशीर होतो. यासोबतच दूरवरच्या टोल प्लाझावर इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. यामुळे प्लाझा सर्व्हर कमी शिल्लक असलेला FASTag वेळेत अॅक्टिव्ह करू शकत नाही. याशिवाय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) रीडर आणि टॅग झीज यांसारख्या समस्या तसेच FASTag वापरणारे लोक चुकीच्या पद्धतीने वापरतात, अशा अनेक समस्या येतात. पण, या नवीन नंबर प्लेट रीडरमुळे ही समस्या दूर होऊ शकते. यावर सध्या काम सुरू आहे, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल,'' अशी माहिती गडकरींनी दिली.