“अपमानास्पद..,” माईक पॉप्मिओंनी सुषमा स्वराज यांच्याबाबत केलेल्या 'त्या' विधानावर जयशंकर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 08:41 AM2023-01-26T08:41:08+5:302023-01-26T08:41:31+5:30
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबद्दल केलेल्या एका दाव्यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संताप व्यक्त केला.
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांनी भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्याबद्दल केलेल्या एका दाव्यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संताप व्यक्त केला. “आपण सुषमा स्वराज यांच्याकडे महत्त्वाची राजकीय व्यक्ती म्हणून पाहिलं नाही, परंतु जयशंकर यांच्यासोबत पहिल्याच भेटीत चांगली मैत्री झाली,” असं त्यांनी म्हटलं होतं. माईक पॉम्पिओ यांचं ‘नेव्हर गिव ॲन इंच - फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ हे पुस्तक मंगळवारी प्रकाशित करण्यात आलं. यात त्यांनी सुषमा स्वराज यांचा चुकीच्या पद्धतीनं उल्लेख करत त्यांनी अपमानास्पद शब्दही वापरले.
सुषमा स्वराज यांनी मे २०१४ ते मे २०१९ पर्यंत मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून कामकाज पाहिलं. ऑगस्ट २०१९ मध्ये सुषमा स्वराज यांचं निधन झाले. “पॉम्पिओ यांच्या पुस्तकात सुषमा स्वराज यांच्याबद्दल वापरण्यात आलेल्या अपमानास्पद शब्दांबद्दल मी कठोर शब्दांत निंदा करतो,” असं जयशंकर म्हणाले. पॉम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात अनेक मोठे दावे केले आहेत. २०१९ मध्ये बालाकोट येथे भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देश अणुयुद्धाच्या जवळ आले होते. आपल्यालाही ही माहिती सुषमा स्वराज यांनीच दिल्याचा दावाही त्यांनी आपल्या पुस्तकात केलाय.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार पॉम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत असलेल्या आपल्या संबंधांबाबतही लिहिलं आहे. त्यांनी एस जयशंकर आणि अजित डोवाल यांचाही उल्लेख केला. त्यांनी सुषमा स्वराज यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केला असून त्यांचा उल्लेख ‘गुफबॉल’ असा केलाय. “सुषमा स्वराज या एक महत्त्वपूर्ण प्लेअर नव्हत्या. यापेक्षा चांगलं मी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत काम केलं, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू होते,” असं पॉम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलंय.
जयशंकर यांचा संताप
“मी पॉम्पिओ यांच्या पुस्तकातील सुषणा स्वराज यांचा उल्लेख असलेला भाग पाहिला आहे. मी त्यांचा (सुषमा स्वराज) यांचा कायम सन्मान केलाय. त्यांच्यासोबत माझे घनिष्ठ आणि उत्तम संबंध होते. पॉम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेल्या अपमानास्पद बाबींची मी कठोर शब्दात निंदा करतो,” असं ते म्हणाले.
जयशंकर यांचं कौतुक
पॉम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात जयशंकर यांच्यासाठी ‘जे’ शब्द वापरला आहे. “२०१९ मध्ये आम्ही भारताच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांच्या रुपात ‘जे’ यांचं स्वागत केलं. मी त्यांच्यापेक्षा उत्तम परराष्ट्रमंत्र्यांची अपेक्षा करू शकत नव्हतो. ते इंग्रजीसह सात भाषांमध्ये बोलतात. इतकंच नाहीतर त्यांची भाषा माझ्यापेक्षाही चांगली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.