महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 06:28 AM2024-05-28T06:28:10+5:302024-05-28T06:28:31+5:30

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, १३ मे रोजी एनआयएने हा तपास स्वत:कडे घेत कारवाई सुरू केली आहे.

National Investigation Agency action in various states including Maharashtra; Five people arrested in human trafficking case | महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गरजू भारतीय तरुणांना जाळ्यात ओढायचे. नोकरीच्या बहाण्याने तरुणांना लाओससह विविध देशांत नेत त्यांच्याकडून जबरदस्तीने अनधिकृत कॉल सेंटरमध्ये ठगीचे काम करून घेणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि चंडीगडमध्ये १५ ठिकाणी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.

एनआयएने कारवाईत वडोदरा येथील मनीष हिंगू, गोपालगंजचा पहलद सिंग, दक्षिण पश्चिम दिल्लीचा नबियालम रे, गुरुग्रामचा बलवंत कटारिया आणि चंडीगडचा सरताज सिंग यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ८ ने यापूर्वी या प्रकरणात कारवाई करत जेरी फिलिप्स जेकब (४६), गॉडफ्रे थॉमस अल्वारेस (३९) या दोघांना अटक केली होती. जेकब आणि अल्वारेस यांनी गरजू तरुणांना हेरून त्यांना चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. तेथे त्यांना विनापरवाना लाओसच्या अनधिकृत कॉल सेंटरमध्ये जबरदस्तीने नोकरी करण्यास भाग पाडत होते. तरुणांनी नकार देत पुन्हा मायदेशी परतण्याचा हट्ट धरताच आरोपीकडून त्यांना मारहाण करत पैसे वसूल करण्यात येत होते. या आरोपींच्या तावडीतून मायदेशी परतलेला ठाण्यातील रहिवासी असलेला सिद्धार्थ यादव (२३) या तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. यामध्ये शेकडो तरुण अडकल्याचा संशयही वर्तविण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, १३ मे रोजी एनआयएने हा तपास स्वत:कडे घेत कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, सोमवारी एनआयएने सर्व ठिकाणी राज्य पोलिस दल आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांसोबत संयुक्तपणे कारवाई केली आहे. या ऑपरेशनमध्ये कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, हस्तलिखित रजिस्टर,  पासपोर्ट, बोगस परदेशी रोजगार पत्रे इत्यादींसह अनेक महत्त्वपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आठ नवीन गुन्हे विविध राज्यांत नोंदवत पाच जणांना अटक केली आहे.

Web Title: National Investigation Agency action in various states including Maharashtra; Five people arrested in human trafficking case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.