स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्दे ठरताहेत अधिक प्रभावी; कलम ३७०, यूसीसी विरुद्ध बेरोजगारी, महागाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:25 AM2024-04-17T06:25:56+5:302024-04-17T06:26:31+5:30
उत्तराखंडमध्ये यंदा स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय राजकारणातील मुद्देच अधिक प्रभावी ठरत आहेत.
संतोष सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क
डेहराडून : उत्तराखंडमध्ये यंदा स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय राजकारणातील मुद्देच अधिक प्रभावी ठरत आहेत. उत्तराखंडच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकींचा आतापर्यंतचा कल पाहता राज्याच्या स्थापनेपासून भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या परंतु राजकीयदृष्ट्या तेवढ्याच महत्वाच्या असलेल्या पहाडी मतांना अत्यंत महत्व आहे. त्यामुळे मुख्यत्वे भाजपने या ठिकाणी आपल्या प्रचाराचा ’फोकस’ कायम ठेवला आहे.
भाजपने गेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये उत्तराखंडमध्ये क्लीन स्विप मिळवला आहे. इतर राज्यांप्रमाणेच उत्तराखंडमध्येही भाजपने यूनिफॉर्म सिव्हील कोड (यूसीसी), कलम ३७०, अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर या मुद्द्यांवर निवडणुकीचा प्रचार राबवला. देशात यूसीसी लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड ठरले होते. त्यामुळे या जोरावरच भाजपचा प्रचार सुरु आहे. उत्तराखंड राज्य सैनिकीदृष्ट्या अत्यंत संवेदनशिल आहे. त्यामुळे काँग्रेसने अग्निवीर सारख्या मुद्द्यांवरुन भाजपला घेरलं आहे. दुसरीकडे बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांप्रमाणेच निवडणूक रोख्यांचा विषयही काँग्रेसने लावून धरला आहे.
हरिद्वारकडे विशेष लक्ष
भाजपने हरिद्वारच्या जागेवर विद्यमान खासदार रमेश पोखरियाल निशंक यांची उमेदवारी कापून माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे पुत्र विरेंद्र रावत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवरील लढतीकडे विशेष लक्ष आहे.
प्रियांका गांधी एकट्या लढवताहेत प्रचाराचा किल्ला
उत्तराखंडमध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासारखी बलाढ्य प्रचार साखळी असताना दुरीकडे काँग्रेसने मात्र या ठिकाणी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावरच प्रचाराची धुरा ठेवली होती. या ठिकाणी प्रियंका गांधींकडून सभा, रॅलीव्दारे मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत.