जामिया युनिव्हर्सिटीची वेबसाइट हॅक, लिहिलं, 'Happy Birthday Pooja'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 01:05 PM2018-05-22T13:05:04+5:302018-05-22T13:05:04+5:30
जामिया मिल्लिया इस्लामियाची अधिकृत वेबसाइट www.jmi.ac.inला रात्री 12 वाजता हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सनं वेबसाइटच्या पूर्ण स्क्रीनला ब्लॅक करून टाकलं असून, त्यावर हॅपी बर्थडे पूजा असं लिहिलं आहे.
नवी दिल्ली- जामिया मिल्लिया इस्लामियाची अधिकृत वेबसाइट www.jmi.ac.inला रात्री 12 वाजता हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सनं वेबसाइटच्या पूर्ण स्क्रीनला ब्लॅक करून टाकलं असून, त्यावर हॅपी बर्थडे पूजा असं लिहिलं आहे. तसेच स्क्रीनच्या खाली लाल रंगाच्या छोट्या अक्षरात 'Your LOVE' असेही शब्द लिहिलेले पाहायला मिळतायत.
तसेच वेबसाइटच्या खालच्या बाजूला सफेद रंगात T3AM लिहिल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर ही बातमी वा-यासारखी पसरली आहे. सोशल मीडियावर युझर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता पूर्ण जामियाला समजलं असेल की, 22 मे रोजी पूजाचा जन्मदिवस आहे, अशी प्रतिक्रिया एक युझर्सनं दिली आहे. कोणत्या तरी टेक्नोसेव्ही चाहत्यानं वेबसाइट हॅक केल्याचंही दुसरा एक युझर्स म्हणाला आहे. परंतु जामिया युनिव्हर्सिटीची वेबसाइट कोणी हॅक केली आहे, याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.
यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली होती. त्यावेळी ब्राझीलच्या हॅकर्सवर शंका उपस्थित केली गेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण वेबसाइटवर “hackeado por HighTech Brazil HackTeam” लिहिलेलं होतं. तसेच गेल्या वर्षी केंद्रीय गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि कायदा आणि कामगार मंत्रालयाचीही वेबसाइटही हॅक करण्यात आली होती.