National Language: हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही? जाणून घ्या राष्ट्रभाषा-राजभाषा आणि मातृभाषेतील अंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:56 AM2022-04-28T11:56:35+5:302022-04-28T11:56:45+5:30
National Language: भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात अनेक भाषा आणि बोली लिहिल्या, वाचल्या आणि बोलल्या जातात. अशा परिस्थितीत राष्ट्रभाषेबाबत आपले संविधान काय सांगते, ते जाणून घेऊया.
National Language: सोशल मीडिया दररोज विविध गोष्टींवरुन वाद-प्रतिवाद केले जातात. सध्या देशात भाषेचा वाद सुरू झाला आहे. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, असे दाक्षिणात्य चित्रपटांचा अभिनेता किचा सुदीपने सांगितल्यावर बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगणने त्याला सुनावले. या दोन्ही स्टार्समध्ये कोणताही वाद वाढण्याआधीच आपापसात समेट घडवून आणला गेला, मात्र सोशल मीडियावर हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? अशी चर्चा सुरू झाली. देशाची राज्यघटना याबद्दल काय सांगते आणि कोणत्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून अधिकृत मान्यता आहे? देशाची अधिकृत राष्ट्रीय भाषा कोणती आहे ते जाणून घेऊया.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी ओळख आहे. भारतात अनेक भाषा आणि बोली बोलल्या, लिहिल्या आणि वाचल्या जातात. अशा स्थितीत कोणत्याही एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. भारतातील मोठी लोकसंख्या हिंदी भाषिक आहे हिंदी न बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच भारतात प्रत्येकाला एकच राष्ट्रीय भाषा शिकण्याची आणि बोलण्याची सक्ती नाही.
14 सप्टेंबरला हिंदी दिवस का साजरा केला जातो?
भारताला त्यांच्या भिन्नतेमुळे राष्ट्रभाषा नाही, परंतु सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी भाषिक आधार निर्माण करण्यासाठी हिंदीला अधिकृत भाषेचा(राजभाषा) दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीच्या महत्त्वाच्या तरतुदी संविधानाच्या भाग 17 मध्येही करण्यात आल्या आहेत.
हिंदी ही राजभाषा कधी झाली?
14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर 1953 पासून राजभाषा प्रचार समितीतर्फे दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात येऊ लागले. भारतीय राज्यघटनेच्या भाग 17 च्या कलम 343(1) मध्ये असे म्हटले आहे की राष्ट्राची अधिकृत भाषा हिंदी आणि लिपी देवनागरी असेल.
मातृभाषा कोणाला म्हणतात?
मातृभाषा ही अशी भाषा आहे जी आपण जन्माने शिकतो. आपण जिथे जन्मलो तिथे बोलली जाणारी भाषा स्वतःच शिकली जाते. जी भाषा आपण जन्मानंतर प्रथम शिकतो, तिला आपण आपली मातृभाषा मानतो. आजवर देशात कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही आणि सर्व भाषांना समान आदर व सन्मान मिळाला आहे. देशातील कुठल्याही नागरिकाला संपूर्ण देशात त्याची मातृभाषा बोलण्यास, लिहिण्यास आणि वाचण्याचे स्वातंत्र्य आहे.