परदेशी वस्तूंना आता बाय बाय; भारतात पॅरामिलिट्री कँटीनमध्ये मिळणार फक्त स्वदेशी उत्पादनं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:22 PM2020-06-01T17:22:27+5:302020-06-01T17:23:09+5:30
या विदेशी उत्पादनांची जागा आता कॅन्टीनमधील स्वदेशी उत्पादनं घेणार आहेत.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना स्वदेशी उत्पादनांवर जोर देण्याचे आवाहन केले होते. त्याचाच प्रत्यय आता दिसू लागला आहे. केंद्रीय पोलीस कल्याण भांडारातून 1000 हून अधिक विदेशी उत्पादनांची विक्री बंद करण्यात आली आहे. यात मायक्रोवेव्ह ओव्हनपासून पादत्राणे आणि टॉमी हिलफिगर शर्ट सारख्या ब्रांडेड उत्पादनांसह 1000हून अधिक आयात करण्यात आलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. ही परदेशी उत्पादने यापुढे केंद्रीय पोलीस कल्याण भांडार (केपीकेबी)मध्ये उपलब्ध होणार नाहीत. या विदेशी उत्पादनांची जागा आता कॅन्टीनमधील स्वदेशी उत्पादनं घेणार आहेत.
हा निर्णय देशभर अर्धसैनिक (अर्धसैनिक दल) कँटीन चालविणा-या संघटनेने घेतला आहे. या कॅन्टीनमध्ये १ जूनपासून केवळ स्वदेशी उत्पादने विकली जातील. केपीकेबीच्या सर्व कॅन्टीनमध्ये केवळ मेड इन इंडिया उत्पादने विकली जातील, असं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विधानानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय परदेशातून माल आयात करणार्या बर्याच कंपन्यांची उत्पादनेही कॅन्टीनने हटविली आहेत. तसेच केपीकेबीने काही कंपन्यांची उत्पादने कॅन्टीनमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी त्यांच्याकडे माहिती मागितलेली असतानाही ती पुरवली नाही.
केपीकेबीने आता सर्व उत्पादनांना तीन विभागांमध्ये विभागले आहे. यात प्रथम श्रेणी - पूर्णपणे शुद्ध उत्पादित उत्पादनांचा समावेश आहे, दुसर्या प्रकारात - आयातीत कच्चा माल, परंतु उत्पादनांमध्ये तयार केलेली उत्पादने आणि तिसर्या श्रेणीतील - निव्वळ आयात उत्पादनांचा समावेश आहे. केंद्रीय पोलीस कॅन्टीन सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्समध्ये काम करणा-या सुमारे दहा लाख जवानांच्या जवळपास 50 लाख कुटुंबांना ही उत्पादने पुरवते.
कल माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने देश को आत्मनिर्भर बनाने और लोकल प्रोडक्ट्स (भारत में बने उत्पाद) उपयोग करने की एक अपील की जो निश्चित रूप से आने वाले समय में भारत को विश्व का नेतृत्व करने का मार्ग प्रशस्त करेगी। pic.twitter.com/KlYD9Z7UVt
— Amit Shah (@AmitShah) May 13, 2020
विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच घोषणा केली होती की, सीआरपीएफ आणि बीएसएफ सारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (सीएपीएफ) सर्व कॅन्टीन 1 जूनपासून केवळ स्वदेशी उत्पादने विकतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक उत्पादने निवडण्याचे व स्वावलंबी राहण्याचे आवाहन केल्यानंतर गृहनिर्माण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. शहा यांनी देशातील नागरिकांना देशात बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले व इतरांनाही असे करण्यास उद्युक्त केले.