राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये अशक्य, मुख्यमंत्र्यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 07:17 PM2019-07-24T19:17:53+5:302019-07-24T19:23:28+5:30
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करणे शक्य नाही. आणखी किमान पाच महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले आहे.
पणजी - राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करणे शक्य नाही. आणखी किमान पाच महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (24 जुलै) विधानसभेत सांगितले आहे.
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धानिमित्ताने काही कामांच्या निविदा जारी करायला हव्यात पण तारीख निश्चित झाल्यानंतरच निविदा जाहीर करता येईल. काही साहित्य हे विदेशातूनही आणावे लागते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. भोजन, निवास व्यवस्था आदींच्या कामाची निविदा जारी करण्यापूर्वी तारीख ठरणे गरजेचे असते, असे क्रिडा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी सुदिन ढवळीकर यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. क्रिडा स्पर्धासाठी साधन सुविधांचे काम किती पूर्ण झाले आहे अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर गोवा सरकार तयार असून येत्या ऑगस्टमध्येही काही प्रकल्पांचे उद्घाटन करू, असे मंत्री आजगावकर म्हणाले. ढवळीकर यांनी त्यावर अनेक कामे कशी अपूर्ण आहेत व काही कामांना अजून कसा आरंभ देखील झालेला नाही ते स्पष्ट केले. आपण सरकारचीच यादी वाचून दाखवतो, असे ढवळीकर म्हणाले. कामांसाठी सरकारकडे पैसा आहे काय अशीही विचारणा ढवळीकर यांनी केली.
सरकारने क्रिडा स्पर्धासाठीच्या कामांवर आतापर्यंत एकूण 316 कोटी रुपये खर्च केले आहेत. 158 कोटी रुपये आणखी खर्च केले जातील. त्या शिवाय प्रत्यक्ष क्रिडा स्पर्धाशीनिगडीत सोहळे व उपक्रमांवर आणखी 200 कोटी रुपये खर्च येईल. म्हणजेच क्रिडा स्पर्धावर सरकार 675 कोटींचा खर्च करणार आहे, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून यापूर्वीच्या काळात 82 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये आयोजित करणे शक्य नाही. आम्ही जानेवारीनंतर म्हणजे मे महिन्यापर्यंत आयोजित करू. मात्र भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने तारीख ठरवावी लागेल. नोव्हेंबरमध्ये क्रिडा स्पर्धा घेणे हे गोव्यातील खेळाडूंच्या हिताचे नाही. आमच्या टीमने अजून सराव देखील सुरू केलेला नाही. प्रशिक्षकांचीही नियुक्ती झालेली नाही. शेवटी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा या गोमंतकीय खेळाडूंसाठीही फायद्याच्या ठरायला हव्यात असे मुख्यमंत्री म्हणाले. नवी तारीख लवकर मागून घ्यावी अशी सूचना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.