Narendra Modi : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही भावी ऑलिंपिक विजेते घडवण्याचे उत्तम व्यासपीठ - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 09:44 PM2022-09-29T21:44:45+5:302022-09-29T22:00:11+5:30

Narendra Modi : "जागतिक स्तरावर देशाचे नाव उंच करण्यात पुरुषांबरोबरीने महिला खेळाडूंचेही योगदान महत्त्वाचे ठरले आहे."

National sports competition is a great platform to produce future Olympians - Narendra Modi | Narendra Modi : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही भावी ऑलिंपिक विजेते घडवण्याचे उत्तम व्यासपीठ - नरेंद्र मोदी

Narendra Modi : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही भावी ऑलिंपिक विजेते घडवण्याचे उत्तम व्यासपीठ - नरेंद्र मोदी

अहमदाबाद - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसारख्या युवा क्रीडा उत्सवांमधून भावी ऑलिंपिक पदक विजेते निर्माण होतात. देशाचा नावलौकिक उंचावण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठच आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी त्यांनी असं म्हटलं आहे. मोटेरा येथील जागतिक दर्जाच्या स्टेडियमवर हा शानदार सोहळा झाला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या देशात अपेक्षेइतके लक्ष दिले जात नव्हते. २०१४ पासून आम्ही क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे त्यामुळेच टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच टार्गेट ऑलिंपिक पोडियम (टॉप)सारख्या योजनेद्वारे वरिष्ठ खेळाडूंप्रमाणेच ऑलिंपिक विजेते होण्याची क्षमता असलेल्या युवा खेळाडूंना देखील केंद्र शासनातर्फे भरघोस आर्थिक मदत दिली जात आहे. गेल्या तीन चार वर्षांमध्ये केंद्रीय क्रीडा अंदाजपत्रकात 70 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्याही भरपूर वाढली आहे. आता तीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत असही सांगितलं.

पूर्वी अगदी मोजक्याच खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होत असत. आता चाळीसतून अधिक विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर भाग घेत आहेत. जागतिक स्तरावर देशाचे नाव उंच करण्यात पुरुषांबरोबरीने महिला खेळाडूंचेही योगदान महत्त्वाचे ठरले आहे. मोदींच्या हस्ते बडोदा येथे स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाचे ही औपचारिक उद्घाटन करण्यात आले.‌ शंभर कोटीहून अधिक खर्च करून तयार करण्यात आलेल्या या विद्यापीठात अनेक खेळांच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

युवा खेळाडूंना आवाहन करताना मोदी म्हणाले, खेळाडूंनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये निष्ठा खिलाडूवृत्ती व सातत्य ठेवीत भाग घेतला पाहिजे. अपयश हा खेळाचाच एक भाग असतो. त्यामुळे खचून न जाता पुन्हा नव्याने उत्साह आणि ऊर्जा वाढवीत सर्वोच्च यश कसे मिळेल असा खेळाडूंनी विचार केला पाहिजे. जेथे गती असते तेथे प्रगती अवश्य होत असते हे लक्षात घेऊनच खेळाडूंनी प्रगती होण्याकडे लक्ष दिले पाहिजे प्रगती हेच आपल्या जीवनाचेही ध्येय असले पाहिजे.

योगासनासारख्या पारंपारिक भारतीय खेळांनी जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केला आहे. ही भारतीय खेळाडूंसाठी अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे. क्रीडा क्षेत्रातील प्रगतीच अन्य क्षेत्रांमधील प्रगतीसाठी उपयुक्त ठरत असते. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक सर्वोच्च यश कसे मिळवता येईल याकडे खेळाडू त्यांचे पालक व प्रशिक्षकांनी प्राधान्य दिले पाहिजे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 

Web Title: National sports competition is a great platform to produce future Olympians - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.