National Sports Day: क्रीडा दिन केवळ सोहळा ठरू नये; खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 03:04 AM2020-08-29T03:04:01+5:302020-08-29T03:04:25+5:30
विशेषता, भारतीय मातीसोबत नाळ जुळलेल्या देशी खेळांची अवस्था बघविली जात नाही. त्यात खो-खो, मलखांब, आट्यापाट्या यासारखे देशी खेळ अस्तित्वासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे.
आपणास सोहळे साजरे करणे आवडते. सोहळ्यांचे आयोजन करीत आनंद साजरा करण्याची आपणास सवय जडली आहे. अगदी त्याच तत्त्वावर अपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करीत असतो. कार्यक्रम केवळ साजरे करण्यासाठी नसतात. प्रत्येक आयोजनामागे एक संदेश असतो.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ध्यानचंद असे व्यक्तिमत्त्व आहे की ज्याच्याविना देशाचा इतिहास अर्धवट असेल. भारत स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष करीत असताना ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ आॅलिम्पिकसारख्या क्रीडा महाकुंभावत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवीत भारताला चॅम्पियनपद मिळवून देत राष्ट्रभक्ती जागृत करीत होते. ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारताने एकदा नव्हे तर आठवेळा सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. अशा महान खेळाडूला आज वंदन करीत त्यांचे स्वप्न साकार करण्याचे हे पर्व आहे. भारताला क्रिकेटमध्ये नक्कीच महाशक्ती म्हणून ओळखल्या जाते. या खेळाने देशाला सी.के. नायडू, सुनील गावस्कर, कपिल देव , सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्यासारखे दिग्गज खेळाडू दिले आहे. त्यांनी जागतिक पातळीवर देशाची मान उंचावली. पण, केवळ एका क्रिकेटच्या जोरावर भारत क्रीडा जगतात महाशक्ती होऊ शकत नाही. त्यासाठी हॉकीसह अनेक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा आवश्यक आहे.
विशेषता, भारतीय मातीसोबत नाळ जुळलेल्या देशी खेळांची अवस्था बघविली जात नाही. त्यात खो-खो, मलखांब, आट्यापाट्या यासारखे देशी खेळ अस्तित्वासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. सरकारी अनुदानावर अवलंबून असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर या खेळांच्या स्पर्धांचे नियमित अयोजन होत नाही. त्यामुळे या खेळातील प्रतिभावान खेळाडी राष्ट्रीय पातळीवर छाप सोडण्यात अपयशी ठरतात. विशेषत: आट्यापाट्या आणि मलखांब यासारखे खेळ तर लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतीय खेळांचे संचालन करणाऱ्यांनी देशी खेळांना जीवनदान देण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.- डॉ. राम ठाकूर