श्रीलंकेनंतर इसिसनं भारत अन् बांगलादेशला दिली दहशतवादी हल्ल्याची धमकी, पोस्टर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 08:39 AM2019-05-02T08:39:09+5:302019-05-02T08:39:49+5:30
इस्लामिक स्टेट (इसिस)शी संलग्न असलेल्या 'अल मुरसलत' नावाच्या दहशतवादी संघटनेनं श्रीलंकेसारखेच भारत आणि बांगलादेशाला दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली
नवी दिल्लीः इस्लामिक स्टेट (इसिस)शी संलग्न असलेल्या 'अल मुरसलत' नावाच्या दहशतवादी संघटनेनं श्रीलंकेसारखेच भारत आणि बांगलादेशाला दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. इसिसनं अशा धमकीचे पोस्टर्सही जारी केले आहेत. बंगाल आणि हिंदमध्ये खलिफाचा लढा उभारणाऱ्यांचा आवाज कधीही बंद होऊ शकत नाही. आमच्या बदल्याची आग कधीही शांत होणार नाही. ईस्टरच्या दिवशीही श्रीलंकेत तीन चर्चं आणि तीन हॉटेलमध्ये आत्मघातकी हल्ला केला होता, त्यात 253 लोकांना मारण्यात आलं, असं इसिसच्या दहशतवाद्यांनी सांगितलं आहे.
गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इसिसनं अबू मोहम्मद अल- बंगालीला बांगलादेशातील आपला म्होरक्या नियुक्त केला आहे. बंगालीला दहशतवादी हल्ल्याची योजना बनवणं आणि दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. धमकीचे पोस्टर जारी करण्याआधीही इसिसनं बांगलादेशची राजधानी ढाकातल्या गुलिस्ताँ थिएटरमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट घडवला होता. यात कोणाचा मृत्यू झाला नसला तरी पोलीस कर्मचारी जखमी आहेत.
विशेष म्हणजे इसिसनं ही धमकी अशा वेळी दिली जेव्हा इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात सीरियात इसिसनं पराभव स्वीकारला आहे आणि मुस्लिमांना भडकाऊ भाषण दिली आहेत. त्यामुळेच गुप्तचर यंत्रणा इसिसच्या होणाऱ्या छोट्या छोट्या घटनांवर लक्ष ठेवून आहे.