Covid 19 in India: देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, चौथ्या लाटेचे संकेत आहेत का? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:59 AM2022-04-21T08:59:11+5:302022-04-21T08:59:41+5:30
देशात काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे.
नवी दिल्ली-
देशात काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. पण देशात कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत असली तरी कोरोनाची चौथी लाट देशात येणार नाही असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात आढळून येत असलेले कोरोना विषाणूचे व्हेरिअंट हे मूळ विषाणूचे उप-प्रकार आहेत. देशात अद्याप कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिअंट आढळून आलेला नाही. त्यामुळे देशात चौथ्या लाटेची शक्यता खूप कमी आहे, असं ते म्हणाले.
संपूर्ण जगात सध्या बीए.२ व्हेरिअंटचा प्रसार पाहायला मिळतो आहे. ज्यानं बहुतांश लोक संक्रमित आहेत ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे असंही ते म्हणाले. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या शाळा आणि महाविद्यालयं देखील सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लागण होण्याचंही प्रमाण दिसून येत आहे. याच कारणामुळे रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच आता मास्कच्या वापरातूनही नागरिकांची मुक्तता करण्यात आली आहे. याचाही रुग्णसंख्येवर परिणाम होत आहे. मास्क वापराच्या सक्तीला काही लोकांनी नकारात्मक पद्धतीनं घेतलं आहे. त्यामुळेच लोक आता मास्क वापरणंही बंद करत आहेत. याचाही रुग्णसंख्या वाढीवर येत्या काळात परिणाम पाहायला मिळू शकतो, असं मत डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केलं.
मास्कचा वापर बंद करण्याच्या मुद्द्यावर सावधगिरी बाळगायला हवी. जेव्हा तुम्ही लॉकडाऊनचे आणि निर्बंधांचे नियम शिथील करत असता तेव्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असते. या काळात कोरोनाची छोटी लाट आपण पाहू शकतो. पण त्याचं रुपांतर मोठ्या उद्रेकात होईल असं वाटत नाही. तसंच ओमायक्रॉनचं संक्रमण पुढील सहा ते नऊ महिन्यांपर्यंत चालेल असंही ते म्हणाले. रिकॉम्बिनेंट व्हेरिअंट हा एक अपघात होता. त्यामुळे चौथी लाट येईल असं वाटत नाही, असं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेतून येणार्या BA.4, BA.5 या नवीन प्रकारांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हे रीकॉम्बीनंट प्रकार आहेत. ते सर्व ओमायक्रॉन कुटुंबातील आहेत. त्यामुळे नैसर्गिक संसर्गाने आपल्याला जे काही संरक्षण दिले आहे ते दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. हे सुमारे सहा ते नऊ महिने असू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.