शहिदांच्या स्मृती जपणारं राष्ट्रीय युद्ध स्मारक आतून कसं दिसतं? पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 11:08 PM2019-02-25T23:08:12+5:302019-02-25T23:11:29+5:30
राष्ट्रीय युद्ध स्मारकात देशासाठी बलिदान दिलेल्या 25 हजारहून अधिक जवानांची नावं
नवी दिल्ली: देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्धाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी पंतप्रधानांनी देशावर आलेल्या संकटांचा निधड्या छातीनं सामना करणाऱ्या जवानांचं कौतुक केलं. देशावरील संकटांवेळी जवानांनी कायम स्वत:च्या छातीचा कोट केला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं, असंदेखील यावेळी मोदी म्हणाले.
इंडिया गेटजवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आलं आहे. जवळपास 40 एकर परिसरात हे स्मारक उभारण्यात आलं आहे. देशासाठी लढलेल्या जवानांची शौर्य गाथा या ठिकाणी ऐकता येईल. यासाठी 176 कोटी रुपये खर्च आला आहे. 1947 पासून देशासाठी शहीद झालेल्या 25 हजारांहून अधिक जवानांची नावं या ठिकाणी आहेत. या वास्तूच्या मध्यभागी 15 मीटर उंचीचा स्तंभ आहे. या ठिकाणी परमवीर चक्रानं गौरव करण्यात आलेल्या 21 जवानांच्या मूर्ती आहेत.
#NationalWarMemorial is a fitting tribute to our soldiers who laid down their lives defending the nation,
— PIB India (@PIB_India) February 25, 2019
It comprises of four concentric circles
◾️Amar Chakra
◾️Veerta Chakra
◾️Tyag Chakra
◾️Rakshak Chakra pic.twitter.com/3BVsvFqJp0
चार चक्रांमध्ये या वास्तूची विभागणी करण्यात आली आहे. अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र, रक्षक चक्र असे चार विभाग करण्यात आले आहेत. तिन्ही दलातील शहीद जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व जवानांची नावं या ठिकाणी विटांवर कोरण्यात आली आहेत. या स्मारकाचा खालील भाग इंडिया गेटजवळील अमर जवान ज्योतीसारखा दिसतो. या ठिकाणची ज्योत कायम तेवत राहील.