राष्ट्रवादीला खिंडार
By admin | Published: September 26, 2014 12:15 AM2014-09-26T00:15:32+5:302014-09-26T00:15:32+5:30
आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आयोजित भाजपा मेळाव्यात पाच नगरसेवक आणि अंबरनाथ तालुक्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांनी भाजपात प्रवेश केला
बदलापूर : आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आयोजित भाजपा मेळाव्यात पाच नगरसेवक आणि अंबरनाथ तालुक्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढली आहे. कथोरेंसोबत राष्ट्रवादीचे बडे पदाधिकारी भाजपात गेल्याने अंबरनाथ तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
किसन कथोरे यांच्या स्वागतासाठी बदलापूरच्या काटदरे मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद तेली, रमेश सोळसे, विवेक मोरे, मिथुन कोशिंबे आणि नरहरी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास शेलार, पंचायत समिती सभापती शैला बोराडे, नीलिमा सारंगा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि संचालक राजेश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघातील १४० सरपंच, १३० उपसरपंच यांच्यासह अनेक पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला माजी आमदार संजय केळकर, शरद म्हात्रे, राम पातकर, राजन घोरपडे, मिलिंद नार्वेकर, संजय भोईर उपस्थित होते. (प्रतिनिधी)