दहशतवादाला थारा देणाऱ्या देशांचा विरोध व्हावा; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर वार
By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 06:06 PM2020-11-17T18:06:03+5:302020-11-17T18:07:52+5:30
ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचं भाषण; पाकिस्तानवर अप्रत्यक्ष हल्ला
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं. दहशतवादाला पोसणाऱ्या, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा विरोध व्हायला हवा, असं मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बदलांची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
'जागतिक कारभाराच्या कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागली आहेत. बदलत्या काळासोबत यामध्ये बदल न झाल्यानं प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. कारण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची रचना ७५ वर्षे जुनी आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. परिषदेची रचना ७५ वर्षांपूर्वीच्या मानसिकता आणि वास्तविकतेवर बेतलेली आहे. यामध्ये बदल होण्याची नितांत गरज असल्याचं भारताला वाटतं. यामध्ये ब्रिक्स संघटनेतील देश सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे,' असं मोदी म्हणाले.
Terrorism is the biggest problem facing the world today.
— ANI (@ANI) November 17, 2020
We have to ensure that the countries that support the terrorists are held accountable and this problem is tackled in an organized manner: PM Narendra Modi speaking at BRICS Summit, via video conferencing pic.twitter.com/H8c19Y5DZ0
संयुक्त राष्ट्रासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय संघटनादेखील वर्तमानातल्या वास्तवानुसार काम करत नसल्याचं मतही मोदींनी व्यक्त केलं. 'जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक आरोग्य संघटनांमध्येही बदलांची गरज आहे,' असं प्रतिपादन मोदींनी केलं. यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. 'आज संपूर्ण जग दहशतवादाचा सामना करत आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि सहाय्य करणाऱ्या देशांना दोषी ठरवणंदेखील गरजेचं असून एकत्रितपणे या समस्येचा सामना करायला हवा,' असं मोदी म्हणाले.
In 2021, BRICS will complete 15 years. Our 'sherpas' can make a report to evaluate the various decisions taken by us in the past years: PM Narendra Modi at BRICS Summit pic.twitter.com/DACP4altCD
— ANI (@ANI) November 17, 2020
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कार्याचं कौतुक केलं. 'पुतीन यांच्या नेतृत्त्वाखालच्या रशियानं ब्रिक्स संघटनेच्या दहशतवादाविरोधातील रणनीतीला अंतिम स्वरुप दिल्याचा आनंद आहे. ब्रिक्स संघटनेचं हे मोठं यश आहे. भारत आपल्या अध्यक्षतेखाली हे काम आणखी जोमानं पुढे नेईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.