नैसर्गिक आपत्ती , 14 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:56 AM2018-06-15T05:56:15+5:302018-06-15T05:57:07+5:30
देशभरात ठिकठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, दरडीही कोसळल्या आहेत.
नवी दिल्ली - देशभरात ठिकठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, दरडीही कोसळल्या आहेत. ईशान्य भारतात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनच्या तडाख्याने केरळमध्ये प्रचंड नुकसान झाले तर दिल्लीत आलेल्या धुळीच्या वादळाने विमान वाहतूकही कोलमडली आहे. उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसाने १० जणांचा बळी घेतला असून, एकूण देशभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशात 10 बळी
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा वादळाने कहर मांडला असून, बुधवारी उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस व विजा पडल्याने १0 जण मरण पावले असून, २८ जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सीतापूर जिल्ह्यातील ६ जण असून, गोंडा जिल्ह्यातील तीन व फैजाबादच्या एकाचा समावेश आहे. फैजाबाद व लखनऊमध्ये धुळीच्या वादळाच्या तडाख्याची शक्यता हवामान विभागाने मंगळवारीच व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशात आजही अनेक भागांत धुळीचे वादळ असून, त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.
केरळात चौघांचा बळी
कोळीकोड : केरळच्या कोळीकोड व मल्लापूरम जिल्ह्यांत बुधवारपासून पावसाने हैदोस घातला असून, या पावसामुळे काही ठिकाणी रस्तेच वाहून गेले आणि तर काही ठिकाणी पूर्णत: खचले आहेत. भूस्खलन व दरडी कोसळण्याचे प्रकारही झाले असून, त्यात ४ जण मरण पावले आहेत आणि ८ जण बेपत्ता आहेत, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले.
इराण व अफगाणच्या धुळीने दिल्ली, राजस्थानात वादळ
इराण व अफगाणिस्तानातील प्रचंड धुळीच्या वादळाचे परिणाम राजस्थान व राजधानी दिल्लीत जाणवत आहेत. तापलेली जमीन व वेगाने वाहणाऱ्या वाºयासोबत उडणारे धुलीकण यांमुळे दिल्लीत हवा धोकादायक बनली आहे.
धुलीकण १० मानकांपैकी ९ पट जास्त असून ते धोकादायक पातळी ओलांडून ८३० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदवण्यात आले आहे. हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी हा धुळीचा स्रोत इराण, दक्षिण अफगाणिस्तान व राजस्थान असल्याचे सांगितले आहे.
हरयाणाच्या रोहतक व राजस्थानच्या जयपूरमध्ये हवा खूपच प्रदूषित झाली आहे. या भागांत पाऊस पडेपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
इशारा : देशाच्या दक्षिण, मध्य व पूर्व भागांत पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदिगढ, तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागांत येते तीन दिवस २५ ते ३० किमी वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. येथील हवामान १८ जूनपर्यंत कोरडेच राहील.
ईशान्य भारतात पावसाचा हाहाकार
गुवाहाटी : ईशान्य भारतातील आसाम, त्रिपुरा, मणिपूर व अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी हेलिकॉप्टरमधून पूरस्थितीची पाहणी केली. आसाम, मणिपूर व त्रिपुरामध्ये एनडीआरएफची पथके मदतीसाठी रवाना झाली आहेत. आगरतळा, गुवाहाटी शहरांत सर्वत्र पाणी साचले असून, रस्तेही पूर्णत: पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे रुळांवर पाणी आहे आणि काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे.
आसामच्या लामडिंग-बदरपूर हिल स्टेशन परिसरात मुसळधार पावसाने भूस्खलन झाले आहे. यामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. त्रिपुरामध्ये पावसामुळे आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले. हजारो लोकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देव यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे.
इशारा : त्रिपुरा व दक्षिण आसामच्या अनेक भागांमध्ये येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या भागात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
पूरस्थिती : आसाममधील गोलाघाट, कारबी अंगलोंग ईस्ट, कारबी अंगलोंग वेस्ट, विश्वनाथ, करीगंज आणि हैलाकांडी भागात पूरस्थिती आहे.
50
हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. पावसाने अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.