‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ भस्मसात
By Admin | Published: April 27, 2016 04:30 AM2016-04-27T04:30:51+5:302016-04-27T04:30:51+5:30
राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला (नॅचरल हिस्ट्री म्युझियम) सोमवारी लागलेल्या भीषण आगीत हे संग्रहालय जळून भस्मसात झाले.
नवी दिल्ली : मध्य दिल्लीत फिक्कीच्या इमारतीतील राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला (नॅचरल हिस्ट्री म्युझियम) सोमवारी लागलेल्या भीषण आगीत हे संग्रहालय जळून भस्मसात झाले. याठिकाणी जतन करण्यात आलेल्या बहुतांश अमूल्य कलाकृती आणि वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत.
रात्री १.४५ वाजता लागलेली ही आग तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमांनंतर आटोक्यात आणण्यात आली. या दरम्यान अत्याधिक धुरामुळे अग्निशामक दलाच्या सहा जवानांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घटनास्थळाचा दौरा केला. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगून त्यांनी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व संग्रहालयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश दिले. मंत्रालयाच्या अखत्यारित एकूण ३४ संग्रहालये आहेत.
नॅचरल हिस्ट्री म्युझियम ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. तेथे हजारो वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या असून असंख्य लोक दररोज भेट देतात. त्यामुळे आगीत झालेली हानी भरून निघणारी नाही,अशी खंत जावडेकर यांनी व्यक्त केली.
मंडी हाऊसस्थित फिक्की इमारतीतील संग्रहालयाच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली होती. त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण करीत इतर मजल्यांनाही आपल्या विळख्यात घेतले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
>१९७२ साली झाली होती स्थापना
नवी दिल्लीत १९७२ साली नॅचरल हिस्ट्री म्युझियमची स्थापना करण्यात आली होती. नैसर्गिक इतिहासाशी संबंधित देशातील दोन संग्रहालयांपैकी ते एक आहे.
अग्निशामक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आग विझविण्यासाठी किमान ३५ गाड्या वापरण्यात आल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागली तेव्हा इमारतीत जास्त लोक नव्हते आणि अग्निशामक दल तेथे पोहोचताच इमारत रिकामी करण्यात आली.