प्रकृती चिंताजनक; लालूप्रसाद यादव यांना एम्समध्ये हलविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 05:21 IST2021-01-24T05:21:03+5:302021-01-24T05:21:26+5:30
विविध घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेले लालूप्रसाद यादव तुरुंगवास भोगत आहेत

प्रकृती चिंताजनक; लालूप्रसाद यादव यांना एम्समध्ये हलविले
रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना रांची येथून विशेष विमानाने दिल्लीच्या एम्समध्ये शनिवारी हलविण्यात आले.
विविध घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेले लालूप्रसाद यादव तुरुंगवास भोगत आहेत. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर रांची येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र व राजदचे नेते तेजस्वी यादवही रांचीहून दिल्लीला रवाना झाले. काही दिवसांपूर्वी लालूप्रसाद यादव यांच्या दोन्ही किडनी फक्त २५ टक्के क्षमतेने कार्यरत होत्या असे डॉक्टरांनी सांगितले.
लालूप्रसाद यादव यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला आहे. बिहारमधील चारा घोटाळा प्रकरणात त्यांना दोषी ठरविण्यात येऊन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र तुरुंगात असताना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता लालूप्रसाद यादव यांना विशेष विमानाने दिल्लीत नेऊन एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)