नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१)
By admin | Published: September 14, 2015 12:39 AM2015-09-14T00:39:05+5:302015-09-14T00:39:05+5:30
- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया
Next
- ागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया नागपूर : गेले काही महिने नागपूर नाट्य परिषदेत अनेक वाद निर्माण झाले. हे वाद टोकाला पोहोचले आणि नाट्य परिषदेचे दोन गट पडले. याच्या तक्रारी वारंवार मध्यवर्ती शाखेकडे काही कलावंतांनी केल्या. धर्मादाय आयुक्तांकडे नागपूरच्या प्रमोद भुसारी यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून नागपूर शाखेचा वाद, भांडणे संपत नाही आणि न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत भुसारींनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने कार्यकारिणीत चर्चेला येत गेली. भुसारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीच्या कार्यकारिणीबाबत विरोधात बोलतात, सहकार्य करीत नाहीत, असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. अखेर नाट्य परिषदेच्या आजच्या मुंबई येथील मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत प्रमोद भुसारी यांना उपाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. नियामक मंडळाच्या बैठकीत भुसारी यांचा विषय सातत्याने विषय पत्रिकेवर येत होता. त्यावर चर्चा करण्यात वेळ जात होता. भुसारींनी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत पदाचा अस्थायी राजीनामा द्यावा, असे त्यांना सुचविण्यात आले होते. पण भुसारी यांनी राजीनामा देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे नागपूर नाट्य परिषदेचे वाद थांबवा आणि नाराज झालेल्या सदस्यांशी समेट घडवा, अशीही सूचना त्यांना करण्यात आली. पण भुसारींना नागपूर नाट्य परिषदेचे वाद संपविता आले नाहीत आणि नाराज सदस्यांशीही समेट घडवून आणण्यात अपयश आल्याने सातत्याने नागपूर नाट्य परिषदेच्या संदर्भातील तक्रारींचा पाऊस मध्यवर्तीकडे येत होता. परिषदेला यामुळे नाट्य विषयक उपक्रम राबविण्यापेक्षा अंतर्गत भांडणे सोडविण्याचेच उपक्रम करावे लागत होते. नागपूर नाट्य परिषदेचे वाद सोडविण्यासाठी अध्यक्ष मोहन जोशी आणि दीपक करंजीकर नागपूरला येऊन गेले. पण भुसारींच्या विरोधातील सदस्यांशी चर्चा करून काहीच निर्णय होऊ शकला नाही. यात तक्रारी अधिक वाढल्या. भुसारी कार्यकारिणीत उपाध्यक्ष असल्याने बैठकांमध्ये इतर निर्णयांपेक्षा नागपूर नाट्य परिषदेच्या तक्रारींचीच चर्चा जास्त होत होती. त्यात भुसारी यांनी मध्यवर्तीच्या सदस्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्याची लिखित नोंदही असल्याचे मध्यवर्तीच्या सूत्रांकडून कळले आहे. भुसारी नाट्य परिषदेच्या विरोधात कारवाई करीत असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना उपाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याचा निर्णय नियामक मंडळाच्या बैठकीत एकमताने रविवारी मुंबईत घेण्यात आला. या बैठकीला भुसारी मात्र अनुपस्थित होते.