नौदलाची मोठ्या युद्धसरावाची तयारी
By admin | Published: October 30, 2016 02:09 AM2016-10-30T02:09:50+5:302016-10-30T02:09:50+5:30
सीमेवर पाकिस्तानी लष्करासोबत धुमश्चक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदले शत्रूच्या कोणत्याही आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत.
नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानी लष्करासोबत धुमश्चक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदले शत्रूच्या कोणत्याही आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. लष्कर आणि हवाई दलाने आधीच तयारी केली असून, आता नौदलही युद्धसराव करून कंबर कसणार आहे.
या युद्धसरावाला ‘पश्चिम लहर’ असे नाव देण्यात आले असून, पुढील आठवड्यात अरबी समुद्रात तो सुरू होईल. ‘पश्चिम लहर’ यापूर्वी करण्यात आलेल्या डिफेन्स आॅफ गुजरात एक्सरसाईजचेच (डीजीएक्स) विशाल रूप असून, युद्धाच्या सज्जतेचा आढावा घेणे आणि जलमार्गे दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्याची तयारी करणे हा त्याचा उद्देश असल्याचे नौदल सूत्रांनी सांगितले. मुंबईतील पश्चिम नौदल कमांडद्वावारे २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान हा सराव करण्यात येईल. पश्चिम किनारपट्टीवरील या सरावासाठी पाणबुडी आणि युद्धनौकांशिवाय लढाऊ विमान, टेहेळणी विमान आणि मानवरहित विमान यापूर्वीच सरावस्थळी दाखल झाले आहेत. सरावात पूर्वेकडील जहाजांनाही सामील करण्यात आले आहे, असे लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
संरक्षण मंत्रालयाने तिन्ही सैन्यदलांचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल विपीन रावत, एअर मार्शल बी.एस. धनाओ आणि व्हाईस अॅडमिरल के.बी. सिंग यांना आपत्कालीन आर्थिक अधिकारही दिले आहेत. याशिवाय खरेदी समित्याही स्थापन करण्यात आल्या असून, त्या सुरक्षा दलांकडील दारूगोळ्याच्या साठ्यातील त्रुटी लवकरच दूर करतील, असे या सूत्रांनी स्पष्ट केले. गुरुवारी कुपवाडाच्या माचील भागात भारतीय जवानाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न करण्यात आला होता. यात बॅटचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी दहशतवादी आणि बॉर्डर अॅक्शन टीमच्या (बॅट) माध्यमातून भारतात मोठा हल्ला करू शकतात, असा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणेला आहे.