‘नवभारत’ची संपत्ती जप्त होणार
By admin | Published: September 8, 2014 02:23 AM2014-09-08T02:23:18+5:302014-09-08T02:23:18+5:30
नवभारत प्रेस प्रा. लिमिटेडद्वारा तारण ठेवण्यात आलेली संपत्ती जप्त करण्याचा आदेश भोपाळच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) न्यायालयाने दिला आहे
भोपाळ : नवभारत प्रेस प्रा. लिमिटेडद्वारा तारण ठेवण्यात आलेली संपत्ती जप्त करण्याचा आदेश भोपाळच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) न्यायालयाने दिला आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडून घेतलेले कर्ज न फेडल्याबद्दल न्या. बी. एस. जामोद यांनी हा आदेश दिला. याबाबतची सूचना नवभारत प्रेसच्या सर्व संचालकांना देण्यात आली आहे.
नवभारत प्रेस प्रा. लिमिटेडच्या संचालकांनी बँक आॅफ महाराष्ट्रकडून घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात भोपाळच्या जहांगीराबाद येथील एक भूखंड तारण ठेवला होता. या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही आणि बँकेतर्फे संचालकांना वारंवार नोटीस जारी करूनही कर्जाची रक्कम जमा करण्यात आली नाही तेव्हा बँकेतर्फे भोपाळच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार नवभारत प्रेसने बँक आॅफ महाराष्ट्र, जेल रोड, मुर्गी बाजार, जहाँगीराबाद येथील प्लॉट तारण ठेवला होता. नवभारत प्रायव्हेट लि.ने आपला व्यवसाय वाढविण्यासाठी रोख ४.७५ कोटी रुपये, मुदती कर्जाच्या स्वरुपात १.२५ कोटी आणि ६.३ कोटी रुपये घेतले होते. सदर संपत्तीचे मूळ दस्तऐवज बँकेजवळ ठेवले होते. हे कर्ज नवभारत प्रायव्हेट लि.ने आतापर्यंत परत केलेले नाही.
बँकेद्वारे वेळोवेळी सतत संचालकांना कर्ज परतफेडीबद्दल नोटीस पाठवून व इतर सर्व कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर प्रकरण अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेट (एडीएम)च्या न्यायालयात गेले. यावरील सुनावणीनंतर संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयाने नवभारत प्रायव्हेट लि. चे संचालक माहेश्वरी पिता-पुत्र यांना आदेश पाठविले होते. (प्रतिनिधी)