नावेदचे आश्रयदाते अटकेत

By admin | Published: August 9, 2015 04:13 AM2015-08-09T04:13:13+5:302015-08-09T04:13:13+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये पकडल्या गेलेल्या मोहम्मद नावेद याकूब या पाकिस्तानी दहशतवाद्याच्या चौकशीतून किमान तीन पाक पुरस्कृत

Naved patrons detained | नावेदचे आश्रयदाते अटकेत

नावेदचे आश्रयदाते अटकेत

Next

- नबीन सिन्हा,  नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये पकडल्या गेलेल्या मोहम्मद नावेद याकूब या पाकिस्तानी दहशतवाद्याच्या चौकशीतून किमान तीन पाक पुरस्कृत दहशतवाद प्रशिक्षण छावण्यांचा तपशील उघड झाला आहे. नावेदची कसून चौकशी सुरू असतानाच भारतातील शिरकावानंतर त्याला आश्रय देणाऱ्यांना कुलगावमध्ये शनिवारी अटक करण्यात आली.
दहशतवादी नावेदला दीड महिना भारतात कोणी आश्रय दिला, याचा कसून तपास सुरू आहे. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली, तर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक झालेल्यांमध्ये एका ट्रक ड्रायव्हरचा आणि एका बेकरी चालकाचा समावेश आहे.
नावेदला उधमपूरहून श्रीनगरला हेलिकॉप्टरने नेले जाणार होते. पण खराब हवामानामुळे त्याला सडकमार्गेच शुक्रवारी रात्री उशिरा श्रीनगरला नेण्यात आले. तेथे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून त्याचा जबाब घेतला जात आहे. उधमपूरच्या चकमकीत त्याचा साथीदार नौमन उर्फ मोमीन ठार झाला होता. सूत्रानुसार, नावेदने तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या दोघांनाही पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या छावण्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तो आणि त्याचे आणखी तीन साथीदार सीमेवरील कुंपणाच्या तारा कापून उत्तर काश्मीरच्या बारामुल्लामधून भारतात घुसले. सुरुवातीस काही दिवस तंगमार्ग आणि बाबा ऋषी येथे मुक्काम केल्यानंतर हे चौघेही दक्षिण काश्मीरमधील अवंतीपुरा-पुलवामा भागात डोंगरावरील गुहेत राहिले. चौकशीत त्याने ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केला होता त्या त्या ठिकाणांची शहानिशा करण्यासाठी त्याला नेण्यात येत आहे.

उडवाउडवीची उत्तरे
चौकशीत अनेकदा उडवा-उडवीचे उत्तरे देऊन नावेद तपास पथकाची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे तो नेमका कोणत्या ठिकाणांहून भारतीय हद्दीत आला, याचा अंदाज लावता येत नाही. तथापि, माझ्यासारखी २०-२५ अतिरेक्यांनी मागच्या पंधरवड्यात भारतात घुसखोरी केल्याची माहिती नावेदने दिली आहे.

घातपाती कारवायांचे प्रशिक्षण
नावेद याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरनजीक भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांची तीन प्रशिक्षण केंदे्र असून, याच केंद्रांतून नावेदने तीन महिने घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेतले होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील (आयएसआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रशिक्षण केंद्रांना मदत मिळत असल्याची माहिती हाती आली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेलगतची ही प्रशिक्षण केंद्रे लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक मोहम्मद हाफीज सईद, त्याचा मुलगा तल्लाह सईद आणि त्याचे इतर साथीदार चालवितात. नावेदला शस्त्रे कोणी पुरविली, याचाही छडा लावला जात आहे.

40 दहशतवादी उधमपूरच्या पट्ट्यात पाकिस्तानी रेंजर्सच्या मदतीने घुसखोरीचा प्रयत्न करीत असल्याचा इशारा सीमा सुरक्षा दलाने दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दले, महत्त्वाची ठिकाणे, स्वातंत्र्य दिन सोहळ्यांना लक्ष्य करण्याच्या मोहिमेवर आल्याचे त्याने सांगितले.

‘एके-४७’सारखी घातक शस्त्रे, हातबॉम्ब कोणी पुरविले, याबाबत नावेद काही बोलायला तयार नाही. उधमपुरात हल्ल्याच्या दोन दिवस आधीच या अतिरेक्यांना ही शस्त्रे मिळाली होती.

Web Title: Naved patrons detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.