नावेदची लाय डिटेक्टर टेस्ट, काश्मिरात हल्ले सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 10:27 PM2015-08-18T22:27:25+5:302015-08-18T22:27:25+5:30
उधमपूर हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याची मंगळवारी लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली
नवी दिल्ली : उधमपूर हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याची मंगळवारी लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली, तसेच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्या दोन फरार साथीदारांची रेखाचित्रे जारी केली आहेत. दरम्यान, जम्मू आणि काश्मिरात दहशतवादी हल्ले तर सिमेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरूच आहे. सीमेवर तणाव असतानाच पाकिस्तान परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा सुरू करण्याची मागणी भारताकडे केली आहे.
नावेदचा साथीदार झारघन ऊर्फ मोहम्मद भाई हा ३८ ते ४० वर्षांचा तर अबू ओकाशा हा १७ ते १८ वर्षांचा आहे. एनआयएने या दोघांच्या अटकेसाठी माहिती पुरविणाऱ्यांना प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीसही जाहीर केले. नावेदने भारतातील त्याचा संपर्क आणि त्याने कोणत्या मार्गाने घुसखोरी केली याबाबत दिशाभूल केल्यामुळे त्याची लाय डिटेक्टर टेस्ट पार पाडण्यात आली. दिल्ली न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार त्याला मंगळवारी सकाळी केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत आणण्यात आल्यानंतर काही वेळ एकटे ठेवण्यात आले होते. या चाचणीच्यावेळी गुप्तचर संस्थेसह विविध तपास संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. ५ आॅगस्ट २०१५ रोजी जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे अतिरेक्यांनी बीएसएफच्या वाहनावर हल्ला केला होता. हल्ला करण्याच्या हेतूने लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी गुलमर्ग भागातून भारतीय हद्दीत प्रवेश केल्याची माहिती मिळाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या अतिरेक्यांच्या ठावठिकाण्यांबाबत विश्वसनीय माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल त्याचवेळी त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे एनआयएने स्पष्ट केले आहे.
चौकीवर हल्ला; पोलीस शहीद, नागरिक ठार
श्रीनगर : सोपोरमधील एका मशिदीच्या सुरक्षेत तैनात पोलिसांवर मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरपासून सुमारे ५२ कि.मी. अंतरावरील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये तुज्जर शरीफजवळील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला कॉन्स्टेबल फयाज अहमद याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक नागरिकही ठार झाला. गोळीबारानंतर दहशतवादी पोलिसांजवळील रायफली हिसकावून फरार झाले. अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली आहे.
पोलीस आणि सुरक्षा दले फरार अतिरेक्यांचा शोध घेत असून विविध ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली. (वृत्तसंस्था)