मला हटवून नवज्योत सिंग सिद्धूंना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचंय, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 15:07 IST2019-05-19T15:06:47+5:302019-05-19T15:07:07+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.

मला हटवून नवज्योत सिंग सिद्धूंना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचंय, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आरोप
चंदीगडः पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अमरिंदर सिंग पत्रकारांना उद्देशून म्हणाले, सिद्धू माझ्या जागी मुख्यमंत्री बनू इच्छित आहे. सिद्धू हा काँग्रेसचं प्रतिमा मलिन करत आहे. पक्षानं त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे. कॅप्टन सिद्धूंना लक्ष्य करत म्हणाले, खरंच सिद्धूंनी काँग्रेस विचारधारा स्वीकारली असल्यास त्यांनी तक्रारीसाठी निवडणुकीचा काळ निवडला नसता. पतियाळात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात असलेल्या कॅप्टन यांनी पत्रकारांशी बातचीत करताना हा हल्ला चढवला आहे.
सिद्धू विरोधात कारवाई करावी की नाही, हे पार्टीच्या हायकमांडनं ठरवावं. परंतु काँग्रेसनं शिस्त भंग केल्याचं सहन करू नये. माझी त्यांच्याविरोधात खासगी तक्रार नाही, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री बनू इच्छितात. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं की, जर राज्यात काँग्रेस निवडणूक हारली तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. इतकंच नव्हे, तर त्यांनी सर्वच आमदार आणि मंत्र्यांना काँग्रेसच्या कामगिरीची जबाबदारी सोपवल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
तत्पूर्वी 14 मे रोजी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी आरोप केला होता की, अमरिंदर सिंग यांच्यामुळेच पंजाबच्या प्रभारी आशा कुमारी यांना अमृतसर मतदारसंघातून तिकीट मिळालं नाही. परंतु अमरिंदर सिंग यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.आम्ही अमृतसरमधल्या बठिंडा जागेवरून त्यांना तिकीट देत होतो. पण ती तिथून निवडणूक लढवण्यास नकार दिला. तिकीट वाटपाचं सर्वच काम दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांकडे होतं. त्याच माझी कोणतीही भूमिका नसल्याचंही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.