Navjot Singh Sidhu: नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा; सिद्धूंची पत्नी संतापली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 04:27 PM2023-01-26T16:27:27+5:302023-01-26T16:27:59+5:30
३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात पटियाला तुरुंगात सिद्धू एक वर्षाची शिक्षा भोगत आहे. त्यांची सुटका होणार म्हणून त्यांच्या समर्थकांनी आधीच मोठी तयारी केली होती.
चंदीगढ : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वादग्रस्त क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या समर्थकांना मोठा झटका बसला आहे. सिद्धूंना आज तुरुंगातून सोडण्यात येणार होते. परंतू टळल्याने सिद्धूंची पत्नी संतापली आहे.
तुरुंगात चांगल्या वागण्यामुळे सिद्धुंची शिक्षा कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे प्रजासत्ताक दिनी त्यांना तुरुंगातून सोडण्यात येणार होते. मात्र, त्यांची सुटका लांबली आहे. २६ जानेवारीला सोडण्यात येणाऱ्या कैद्यांच्या यादीला पंजाब सरकारने मंजुरीच दिलेली नाही.
सिद्धूंच्या पत्नीने यावर संताप व्यक्त केला आहे. ट्विट करून म्हटले आहे की, "सिद्धू भयंकर प्राण्यांच्या श्रेणीत येतो, त्यामुळे सरकार त्याला सोडू इच्छित नाही, आपणा सर्वांना विनंती आहे की त्याच्यापासून दूर रहा."
३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात पटियाला तुरुंगात सिद्धू एक वर्षाची शिक्षा भोगत आहे. त्यांची सुटका होणार म्हणून त्यांच्या समर्थकांनी आधीच मोठी तयारी केली होती. ती वाया गेली आहे. सिद्धूंचे स्वागत करण्यासाठी पंजाबच्या विविध भागात पोस्टर चिकटवण्यात आले होते. सिद्धूंच्या समर्थकांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक नकाशा देखील शेअर केला होता, सिद्धू कोणत्या मार्गावरून जाणार हे त्यात सांगण्यात आले होते. या ट्विटमध्ये त्यांच्या समर्थकांनी लोकांना सिद्धूचे स्वागत करण्याचे आवाहन केले होते.
सिद्धूला २० मे रोजी तुरुंगात नेण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. डिसेंबर 1988 च्या रोड रेज प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. ज्यामध्ये पार्किंगवरून सिद्धूसोबत एका वृद्धाचे भांडण झाले आणि रागाच्या भरात सिद्धूने त्याला धक्काबुक्की केली, त्यानंतर वृद्धाचा मृत्यू झाला होता. सिद्धूने आठ महिन्यांची शिक्षा भोगली आहे.