नवज्योत सिंग सिद्धूंचे पटियाला कोर्टात आत्मसमर्पण; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:22 AM2022-05-21T06:22:58+5:302022-05-21T06:23:44+5:30
नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडून दाखल क्यूरेटिव्ह पिटीशनवर तत्काळ सुनावणीस न्यायालयाने नकार दिला.
बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी शुक्रवारी पटियाला येथील कोर्टात आत्मसमर्पण केले. रोडरेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू यांच्याकडून दाखल क्यूरेटिव्ह पिटीशनवर तत्काळ सुनावणीस न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे आत्मसमर्पण करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही.
सिद्धू यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आत्मसमर्पणासाठी एका आठवड्याची मुदत मागितली होती. मात्र, त्यांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सिद्धू यांना फोन केला आणि सांगितले की, काँग्रेस पक्ष आपल्यासोबत आहे.
सिद्धू यांना एक वर्षांची शिक्षा देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मृत गुरनाम सिंग यांच्या कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. गुरनाम यांची सून परवीन कौर म्हणाल्या की, सिद्धू यांच्याविरुद्धच्या ३४ वर्षांपासूनच्या लढाईत आमचे मनोबल कधी कमी झाले नाही.