नवज्योतसिंग सिद्धू यांची आज सुटका होणार; तुरुंगात ३४ किलो वजन केले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 08:46 AM2023-04-01T08:46:58+5:302023-04-01T08:47:24+5:30
सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही त्यांच्या सुटकेची माहिती दिली आहे.
चंडीगड : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची १ एप्रिल रोजी पतियाळा तुरुंगातून सुटका होणार आहे. ‘रोड रेज’ प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर, त्यांनी २० एप्रिल रोजी पतियाळा न्यायालयात आत्मसमर्पण केले होते.
सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही त्यांच्या सुटकेची माहिती दिली आहे. शिक्षेदरम्यान सिद्धू यांनी एकदाही पॅरोल घेतला नाही. सिद्धू यांची या वर्षी २६ जानेवारीला सुटका होणार असल्याची चर्चा होती, परंतु ज्या कैद्यांची शिक्षा मंत्रिमंडळाने प्रजासत्ताक दिनानिमित्त माफ करण्याचा निर्णय घेतला होता, त्यात सिद्धू यांचे नाव नव्हते. यामुळे केवळ त्यांचे समर्थकच निराश झाले नाहीत, तर त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीही पंजाब सरकारवर हल्लाबोल केला. आता १ एप्रिलला सिद्धूच्या सुटकेची बातमी कळल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. तुरुंगात सिद्धू यांनी आपले वजन ३४ किलोने घटविले आहे. तुरुंगात फिरण्यासह योगा करण्यावर भर दिला आहे. सवलतीमुळे सिद्धू १ एप्रिलला तुरुंगातून बाहेर येणार आहेत.