नवज्योत सिद्धूचे मंत्रिपद वाचले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:00 AM2018-05-16T04:00:41+5:302018-05-16T04:00:41+5:30
३० वर्षांपूर्वीच्या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने, पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे मंत्रिपद वाचले.
नवी दिल्ली : ३० वर्षांपूर्वीच्या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने, पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे मंत्रिपद वाचले. दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाली असती, तर सिद्धूंना राजीनामा द्यावा लागला असता.
सिद्धू व त्यांचे मित्र रूपिंदर सिंग संधू २७ डिसेंबर १९८८ रोजी पतियाळा जिल्ह्यात महामार्गावर मोटार उभी करून खरेदी करायला गेले होते. गुरनाम सिंग या मोटारचालकाने त्यास आक्षेप घेतला. त्या वेळी रागाच्या भरात सिद्धू व संधू यांनी गुरनाम यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचे निधन झाले. या खटल्यात सत्र न्यायालयाने सिद्धू व संधू यांना निर्दोष मुक्त केले. मात्र, उच्च न्यायालयाने सिद्धू यांना सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवून, तीन वर्षांचा कारावास व एक लाख रुपये दंड ठोठावला. सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत जामीन दिल्याने सिद्धू तुरुंगात गेले नाहीत.
याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दोन अपिले केली गेली. खंडपीठाने सिद्धू यांना भादंवि कलम ३२३ अन्वये किरकोळ दुखापत करण्याच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून एक हजार रुपये दंड ठोठावला.
> एक हजार रुपये दंड ठोठावून न्यायालयाने थट्टा करीत मयताच्या जखमांवर मीठ चोळले आहे. सिद्धू ‘सेलिब्रिटी’ असल्याने मवाळ शिक्षा दिली गेली.
- अभिजीत, गुरनाम सिंग यांचा कुटुंबीय
> जनतेच्या प्रार्थनेमुळेच मी ताठ मानेने बाहेर पडलो. माझे आयुष्य सर्वस्वी जनतेच्या हाती सोपवित आहे, असा संदेश राहुलजी व सोनियाजी यांनी पाठविला आहे.
- नवज्योत सिंग सिद्धू