गोव्याजवळ समुद्रात नौदलाचे विमान कोसळले
By admin | Published: March 26, 2015 01:16 AM2015-03-26T01:16:21+5:302015-03-26T01:16:21+5:30
गोव्याजवळ खोल समुद्रात मंगळवारी रात्री नौदलाचे डॉर्नियर हे टेहळणी विमान कोसळून दोघे अधिकारी बेपत्ता झाले आहेत. त्यात एका महिलेचाही समावेश आहे.
पणजी : गोव्याजवळ खोल समुद्रात मंगळवारी रात्री नौदलाचे डॉर्नियर हे टेहळणी विमान कोसळून दोघे अधिकारी बेपत्ता झाले आहेत. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. विमानाच्या कॅप्टनला वाचवण्यात मच्छीमारांना यश आले. नऊ नौकांद्वारे दोघा बेपत्ता प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. गोव्याजवळ २५ सागरी मैलावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास खोल समुद्रात हे विमान कोसळले. डॉर्नियर विमान कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे.
नौदलाच्या गोवा केंद्राशी या विमानाचा रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी संपर्क तुटला. दुर्घटनेनंतर प्रशिक्षणार्थी निरीक्षक महिला व प्रशिक्षणार्थी पायलट बेपत्ता झाले आहेत. दुर्घटनेच्या एका तासानंतर लेफ्टनंट कमांडर कुलदीप जोशी यांना वाचविण्यात मच्छीमारांना यश आले. मच्छीमारी बोटीवरील खलाशांनी नौदलाशी संपर्क केल्यानंतर नौदलाच्या विमानाने कॅप्टन जोशी यांना रुग्णालयात हलविण्यात आले. भारतीय नौदलाच्या सेवेत ९0 च्या दशकात डॉर्नियर विमाने दाखल झाली.