नौदलाला मिळणार 111 हेलिकॉप्टर्सचे बळ, 21 हजार कोटींच्या करारास संरक्षण मंत्रालयाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 06:21 PM2018-08-25T18:21:53+5:302018-08-25T20:29:27+5:30
संरक्षण मंत्रालयाने लष्कर आणि नौदलाच्यासाठीच्या मोठ्या करारास परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाने लष्कर आणि नौदलाच्यासाठीच्या मोठ्या करारास परवानगी दिली आहे. या करारामधून नौदलासाठी 111 हेलिकॉप्टर्स आणि लष्करासाठी सुमारे 150 आर्टिलरी गन सिस्टिम खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी सुमारे 21 हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाकडूवन एकूण 46 हजार कोटींच्या खरेदी व्यवहारांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्येच या हेलिकॉप्टर डीलचा समावेश आहे.
सैन्यदलांसाठीच्या या साहित्याचा खरेदीचा निर्णय संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (DAC) बैठकीत घेण्यात आला. डीएससी ही सैन्यासंबंधी खरेदी विक्रीचा निर्णय घेणारी मोठी संस्था आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या काराराबाबत सांगितले की, डीएसीने एकूण 111 हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यासाठी 21 हजार कोटी रुपये खर्च होतील. संरक्षण क्षेत्रातील भागीदारीनुसार संरक्षण मंत्रालयाचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे हा या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे.
डीएसीने अजून काही खरेदी व्यवहारांनाही मंजुरी दिली आहे. त्यावर सुमारे 24 हजार 879 कोटी रुपये खर्च होतील. या खरेदी व्यवहारामधून लष्करासाठी 155 एमएमटची 150 आर्टिलरी गन खरेदी करण्यात येतील. या गन भारतातच विकसित केल्या जातील. या गन डिफेन्स आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) कडून डिझाइन आणि विकसित करण्यात येतील. त्यासाठी सुमारे तीन हजार 364 कोटी रुपये खर्च होतील. तसेच 14 व्हर्टिकल लॉन्च होणारी शॉर्ट रेंज मिसाईल प्रणाली खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठीची ही महत्त्वपूर्ण खरेदी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती.