नौदलाचे मोठे पाऊल! मेसमध्ये जवान कुर्ता-पायजमा घालू शकणार; गुलामगिरीची प्रतिके हटविण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 14:13 IST2024-02-14T14:13:23+5:302024-02-14T14:13:38+5:30
इंग्रजांच्या काळातील त्यांच्या गुलामगिरीची प्रतिके हळूहळू नष्ट केली जाणार आहेत.

नौदलाचे मोठे पाऊल! मेसमध्ये जवान कुर्ता-पायजमा घालू शकणार; गुलामगिरीची प्रतिके हटविण्यास सुरुवात
भारतीय सैन्य दलात भारतीयीकरण करण्याकडे नौदलाने एक मोठे पाऊल टाकले आहे. नौदलात आता कुर्ता-पायजम्याची एन्ट्री होणार आहे. केंद्र सरकारने याचे निर्देश दिले आहेत. यामुळे इंग्रजांच्या काळातील त्यांच्या गुलामगिरीची प्रतिके हळूहळू नष्ट केली जाणार आहेत.
नौदलाने सर्व कमांडना आदेश दिले आहेत की मेस आणि इतर ठिकाणी वावरताना अधिकारी आणि जवानांनी कुर्ता-पायजमा घालावा. स्लीव्हलेस जॅकेट, बुट किंवा सँडलसोबत कुर्ता पायजमा घालण्याची परवानगी दिली जावी असे यात म्हटले आहे.
असे असले तरी कुर्ता-पायजमाचा रंग, कट आणि आकार याबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सॉलिड टोन' कुर्ता असावा. कुर्त्याची लांबी फक्त गुडघ्यापर्यंत असावी. कमरपट्टा आणि साइड पॉकेट्स असलेला पायजमा असावा. 'मॅचिंग पॉकेट स्क्वेअर' स्लीव्हलेस आणि स्ट्रेट कट वास्कट असे जॅकेट घालता येईल. ब्लू आणि नेव्ही ब्ल्यू अशा दोन रंग संगतीत हा कुर्ता पायजमा असणार आहे.
'कुर्ता-चुरीदार' किंवा 'कुर्ता-पलाझो' घालू इच्छिणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठीही अशाच सूचना आहेत. हा नवीन ड्रेस कोड युद्धनौका किंवा पाणबुड्यांना लागू नाही. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. सप्टेंबरमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली होती. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीच्या मेसमध्ये पुरुष कर्मचारी तसेच पाहुण्यांसाठी कुर्ता-पायजमा यावर बंदी होती. हळूहळू ती खुली करण्यात येत आहे.