Nawab Malik: नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात, मग अकाऊंवरुन ट्विट कोण करतंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 06:05 PM2022-02-23T18:05:09+5:302022-02-23T18:06:42+5:30
Nawab Malik: नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे
मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले होते. त्यांतरच्या 8 तासांच्या चौकशीनंतर अखेर मलिक यांना ईडीनं अटक केली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर दिवसभरातून राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या भूमिका मलिक यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात येत आहेत.
नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या असून ट्विटरवरुन या सर्वच प्रतिक्रिया शेअर करण्यात आल्या आहेत. मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आणि त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती शेअर करण्यात येत आहे. नवाब मलिक यांच्या कार्यालयीन ट्विटर हँडलवरुन सर्वप्रथम सकाळी 10.23 वाजता मलिक यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती देण्यात आली.
Today morning the ED had come to @nawabmalikncp saheb's residence. They accompanied saheb in his vehicle to the ED office. Advocate Amir Malik, Saheb's son has accompanied saheb along with.
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022
नवाब मलिक यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट रिट्विट केलं आहे. त्यानंतर, सर्वच घटनाक्रम या दोन्ही ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे, जर नवाब मलिक हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी असतील तर त्यांचं ट्विटर अकाऊंट कोण चालवतंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे अधिकार कोणाला दिले आहेत, तसेच त्यावर लिहिणारी, ट्विट करणारी व्यक्ती ही मलिकांच्या खास विश्वासातील असेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. तर, ईडीच्या चौकशीत असताना अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करता येते का? हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
ना डरेंगे ना झुकेंगे!
सत्य जिंकेलच..!!@nawabmalikncp#WeStandWithNawabMalikpic.twitter.com/ioFbw8xiNO— Babajani Durrani (@babajanidurrani) February 23, 2022
दरम्यान, मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन 3.46 वाजता ट्विट करण्यात आलं आहे. त्यामध्ये, लढेंगे, जितेंगे और सबको एक्सपोज करेंगे! असे ट्विट करण्यात आले आहे. तर, 4.39 वाजात नवाब मलिक यांनी एक ट्विट रिट्विट केलं आहे. बाबाजानी दुर्रानी यांचं हे ट्विट रिट्विट करण्यात आलं आहे. त्यामध्ये, ना डरेंगे.. ना झुकेंगे... सत्य जिंकेलच, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.