बिहार निवडणुकीसाठी रालोआचे जागावाटप
By admin | Published: September 1, 2015 02:11 AM2015-09-01T02:11:33+5:302015-09-01T02:11:33+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआच्या घटक पक्षांमधील जागा वाटप येत्या आठवडाभरात जाहीर करण्यात येईल. जागा वाटपावरून रालोआत कसलेही
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआच्या घटक पक्षांमधील जागा वाटप येत्या आठवडाभरात जाहीर करण्यात येईल. जागा वाटपावरून रालोआत कसलेही मतभेद नाहीत, असे केंद्रीय आणि लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी सोमवारी पाटणा येथे पत्रकारांना सांगितले.
बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्याला ठराविक जागा मिळाव्या अशी मागणी करीत असलेल्या रालोआच्या घटक पक्षांनी सोमवारी एकीचे प्रदर्शन करीत बैठक घेतली. तथापि या पहिल्या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा झाली नाही. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.
पासवान यांनी पत्रकारांना दीड तास चाललेल्या या बैठकीतील चर्चेची माहिती दिली. रालोआचे जागा वाटप लवकरच केले जाईल. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली नाही. आम्ही केवळ निवडणूक प्रचार कसा राहील याबाबत चर्चा केली आणि रालोआ बिहारमध्ये दोन तृतीयांश बहुमताने विजयी होईल, असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला.
रविवारी पाटणा येथे पार पडलेल्या राजद-संजद-काँग्रेसच्या स्वाभिमान रॅलीची ‘फ्लॉप शो’ अशी संभावना करून पासवान पुढे म्हणाले, या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा अवमान करण्यात आला. त्यांना मुख्यमंत्री नितीशकुमार, संजद अध्यक्ष शरद यादव आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या आधी भाषण द्यावे लागले. भाजपाने राज्यात केवळ १०२ जागा लढवाव्या आणि उर्वरित १४२ जागा मित्र पक्षांसाठी सोडाव्या, या लोजपा आणि रालोसपाने केलेल्या मागणीबाबत विचारले असता पासवान म्हणाले, हे फारसे महत्त्वाचे नाही. या मुद्यावर आता एकाही नेत्याने वक्तव्य न करण्याचे आणि केवळ अधिकृत नेत्यांनीच बोलायचे ठरले आहे.