नक्षली नेत्यांसह २५ जणांचा खात्मा
By admin | Published: October 25, 2016 05:00 AM2016-10-25T05:00:23+5:302016-10-25T05:00:23+5:30
आंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांसोबतच्या धुमश्चक्रीत सोमवारी २५ माओवादी मारले गेले. मृतांत माओवाद्यांच्या दोन प्रमुख नेत्यांसह सात महिलांचा समावेश आहे. या चकमकीत आंध्र प्रदेश ग्रेहाऊंडचा
- अंबिका प्रसाद कानुंगो, भुवनेश्वर
आंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांसोबतच्या धुमश्चक्रीत सोमवारी २५ माओवादी मारले गेले. मृतांत माओवाद्यांच्या दोन प्रमुख नेत्यांसह सात महिलांचा समावेश आहे. या चकमकीत आंध्र प्रदेश ग्रेहाऊंडचा एक जवान शहीद, तर दुसरा जखमी झाला. आंध्र-ओडिशा सीमेवरील चित्रकोंडा या दुर्गम भागात ही चकमक झाली.
ओडिशा पोलीस आणि ग्रेहाऊंडच्या संयुक्त कारवाईनंतर घटनास्थळी २५ मृतदेह आढळून आले. यातील काही मृतदेह महिलांचे आहेत. चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले असले, तरी काही पळून गेल्याचा संशय आहे, असे मलकानगिरीचे पोलीस अधीक्षक मित्रभानू महापात्र यांनी सांगितले.
गजारला रवे उर्फ उदय आणि चलापती या उच्चस्तरीय माओवादी नेत्यांचा मृतांत समावेश असण्याची शक्यता आहे. या दोघांच्या शिरावर प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीस होते. गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळाहून १० रायफली, ४ एके-४७ रायफली, ३ एसएलआर, किट बॅग्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला असून, शोधमोहीम सुरूच आहे, असे ओडिशाचे पोलीस महासंचालक के. बी. सिंग यांनी सांगितले. माओवाद्यांच्या आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोन कमिटीचे लोक पानस्पुत ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली होती. ओडिशा पोलिसांनी या माहितीची खातरजमा केल्यानंतर ग्रेहाऊंडने पुढाकार घेत कारवाई केली. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह मलकानगिरी येथे आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
नक्षलवादी येण्या-जाण्यासाठी मलकानगिरी भागाचा वापर करतात. याच जिल्ह्यात सप्टेंबर २०१३ मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत १३ माओवादी मारले गेले होते. तत्पूर्वी माओवाद्यांनी २९ जून २००८
रोजी गे्रहाऊंडच्या जवानांना नेत असलेल्या बोटीवर अलामपाका
येथे हल्ला केला होता. यात ग्रेहाऊंडच्या ३५ जवानांसह ३८ जण मारले गेले होते.
जवानांना हेलिकॉप्टरद्वारे मदत
माओवाद्यांसोबतच्या चकमकीत जखमी झालेला आंध्र प्रदेश ग्रेहाऊंडचा जवान अबुबाकर याचा येथील रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती विशाखापट्टणमचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी दिली. आंध्र-ओडिशा सीमेवरील चकमकीत आणखी एका जवानासह अबुबाकर जखमी झाला होता.
या दोघांना घटनास्थळाहून हेलिकॉप्टरद्वारे आणून येथील किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, दुर्दैवाने अबुबाकर याचा मृत्यू झाला. दुसऱ्या जवानावर उपचार सुरू आहेत. ग्रेहाऊंड हे आंध्र प्रदेशचे नक्षलवादविरोधी पथक आहे.