दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात, महाराष्ट्रासह प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 06:16 AM2023-10-07T06:16:43+5:302023-10-07T06:17:01+5:30
दोन वर्षांत नक्षलवादाचे देशातून पूर्णपणे उच्चाटन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
नवी दिल्ली : दोन वर्षांत नक्षलवादाचे देशातून पूर्णपणे उच्चाटन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. नक्षलवाद प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
आढावा बैठकीला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि झारखंडचे मुख्यमंत्री उपस्थित होते. ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या मंत्र्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
गृह मंत्रालयाने दिली आकडेवारी...
नक्षलग्रस्त राज्यांमध्ये २०१० च्या उच्चांकाच्या तुलनेत २०२२ मध्ये हिंसक घटना ७७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
२००४ ते २०१४ दरम्यान नक्षलवाद संबंधित १७,६७९ घटना आणि ६,९८४ मृत्यू झाले. याउलट २०१४ ते २०२३ (१५ जून २०२३ पर्यंत) नक्षलवादा संबंधित ७,६४९ घटना आणि २०२० मृत्यू झाले.
‘शहरी नक्षलवाद’ रोखण्यास यंत्रणा उभारा : शिंदे
विकास योजनांमुळे नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा चांगलाच बदलत आहे, परंतु शहरी नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलवाद बैठकीत व्यक्त केली. ‘दरवर्षी कोट्यवधी रुपये नक्षलवाद्यांना पाठवले जातात. हा पैशाचा व्यवहार थांबवण्यासाठी आणि त्याची कसून चौकशी करण्यासाठी, अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तिकर विभाग आणि वित्तीय गुप्तचर युनिटचा एक संयुक्त गट तयार केला पाहिजे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.